
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
पाच दिवसापूर्वी घेतलेली नवीन टीयागो कार झाडाखाली सावलीत लावण्यासाठी स्टार्ट केली असता ती कार नियंत्रण सुटल्याने समोरील शेतामधील विहिरीत कोसळून एक 41 वर्षीय शिक्षक बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे आज रविवारी दुपारी घडली.
ईरन्ना बसप्पा जूजगार ( वय 41 वर्ष ,राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचे मूळ गाव मैंदर्गी . पाच दिवसांपूर्वीच त्यांनी टाटा कंपनीची टियागो नवीन मोटार कार ( क्र एम एच 13 इसी 6068 ) खरेदी केली होती.
आज रविवार असल्याने ते आपल्या शेताला डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे कुटुंबासोबत आले होते , त्यांना नवीन गाडी घेतल्याचे पेढेही वाटायचे होते. दुपारी साडेबारा एक वाजता सोलापूरहून भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले सर्व कुटुंबीय व कार ड्रायव्हर घरात गेले तेव्हा शिक्षक इराण्णा झुजगार हे ड्रायव्हर सीटवर बसले आणि ही कार झाडाखाली लावण्यासाठी स्टार्ट केली आणि नियंत्रण सुटल्याने ही कार सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये क्षणार्धात जाऊन कोसळली. नातेवाईक चंद्रशेखर आमले यांनी इतरांच्या सहकार्याने त्यांना पाण्याबाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मयत शिक्षक इराण्णा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.