सोलापूर (आसबे न्यूज ब्यूरो)
सोलापूर महानगरपालिकेच्या टॅक्स विभागाचे कर्मचारी असून घराचे मेजरमेंट घ्यायचे आहे ,अशी बतावणी करून वृद्ध दाम्पत्याच्या घरातील उघड्या कपाटातील साडे चौदा तोळे सोने दोघा भामट्यांनी दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील दमानी नगरातील गडदर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या दिनेश सुरवसे या सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी घडली.
या प्रकरणी दिनेश सुरवसे यांचे चिरंजीव अभिजीत सुरवसे यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने गुन्हे शाखा आणि फौजदार चावडीच्या पोलिसांचा ताफा गडदर्शन सोसायटीमध्ये दाखल झाला. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजसुद्धा चेक केले. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अज्ञात इसम गडदर्शन सोसायटीमध्ये आले. त्यांनी अलीकडील एका घरातील महिलेला धोंडिबा सुरवसे कुठे राहतात असे विचारले. त्यांनी समोर राहतात असे सांगितल्यानंतर ते दिनेश उर्फ धोंडिबा सुरवसे यांच्या घराकडे गेले.
त्यांनी आपली दुचाकी घराच्याबाहेर लावली आणि आत प्रवेश केला. घरामध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक दिनेश सुरवसे आणि त्यांच्या पत्नी होत्या.दोघेही प्रकृती ठीक नसल्याने जागेवर बसून असतात. तर मुलगा कामाला गेला होता आणि सुनबाई माहेरी गेली होती.
या दोघा भामट्यांनी त्यांना आपण सोलापूर महानगरपालिकेच्या टॅक्स विभागाचे कर्मचारी असून घराचे मेजरमेंट घ्यावयाचे असल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले. एकाने त्यांना पावत्यांची फाईल घेऊन घराच्या बाहेर बोलवले तर दुसऱ्याने थेट आतल्या घरातील उघड्या कपाटातून सोने ठेवलेली पर्स घेतली आणि त्यानंतर काम फत्ते करून ते दोघेही घराच्या बाहेर पडले.
त्यानंतर संशय आलेल्या दिनेश सुरवसे यांनी आतल्या खोलीत जाऊन कपाट पाहिले असता त्यातील सोन्याची पर्स त्यांना दिसली नाही. त्यांनी तत्काळ आपल्या मुलाला फोन केला आणि बोलावून घेतले. तोपर्यंत आजूबाजूच्या लोकांनाही याची माहिती झाली होती.
त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापक दिनेश सुरवसे आणि त्यांचा मुलगा अभिजीत हे दोघेजण फौजदार चावडी पोलिसात गेले आणि तेथे त्यांनी झालेली घटना सांगितली. त्यानंतर तात्काळ फौजदार चावडीचे पोलीस अधिकारी उदयसिंह पाटील आणि सतीश भोईटे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस पथक गडदर्शन सोसायटीतील सुरवसे यांच्या घरी आले. त्यांनी घराची सर्व पाहणी केली. आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केली. ज्या महिलेने त्या दोघांना पाहिले होते ,त्यांनाही त्यांनी बोलावून चोरटे नेमके कसे दिसत होते ? आणि कोणत्या वेशात होते आणि कोणती भाषा बोलत होते ? याची माहिती घेतली.
गडदर्शन सोसायटीसह दमानी नगर भागातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले . हे चोरटे कन्नड भाषेतून बोलत होते असे काहींनी सांगितले, तर एक जण मराठीत बोलत होता, असे एका महिलेने सांगितले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास म्हणजेच दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. फौजदार चावडी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नेमके सोने किती गेले, याबाबत एक वाक्यता नसली तरी सकाळी २० तोळे सोने चोरीला गेले, असे सांगणारे सुरवसे कुटुंबातील सदस्य दुपारी मात्र साडेचौदा तोळे सोने गेल्याचे सांगत होते. त्यामुळे फौजदार चावडी पोलिसात नेमके किती सोने चोरीला गेले याबाबत माहिती मिळाली नाही.
(स्त्रोत : आसबे न्यूज ब्यूरो)
बातमी अपडेट होत आहे…
हेही वाचा