शेकापकडून आज विराट शक्तीप्रदर्शन!

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाचा आज सांगोला येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यातून शेतकरी कामगार पक्षकडून शक्ती प्रदर्शन करण्याची जय्यत तयारी झाली आहे. या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाई गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुखही उपस्थित राहणार आहेत.
मार्केट यार्ड कमिटी मैदानावर दुपारी एक वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहून जणू प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. काल रात्री डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सांगोल्याचा उमेदवार कोण हे भाई जयंतराव पाटील मेळाव्यात लोकांची मते जाणून घेऊन घोषित करतील असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र असे असले तरी काल रायगड जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करतानाच जयंत पाटील यांनी सांगोला मतदार संघात बाबासाहेब देशमुख हे उमेदवार असतील, असे सांगून टाकल्याने सांगोल्यातून बाबासाहेब की अनिकेत या वादावर पडदा पडल्यात जमा आहे..
सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख असतील असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच स्वतः जयंत पाटील हे सांगोल्यात येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने या मेळाव्याचे महत्त्व वाढले आहे. हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.