भीमगीतांचा तरुण आवाज हरपला, गायक सार्थक शिंदे यांचे निधन

मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील आघाडीचे आंबेडकरी गायक तथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे नातू सार्थक दिनकर शिंदे यांचे दुःखद निधन झाले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Singar Sarthak Shinde passed away)
सार्थक शिंदे हे दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र होते. सार्थक शिंदे यांनी अनेक गीते गायली आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीम गीतांचे कार्यक्रम झाले आहेत. सार्थक शिंदे यांना ढोलकी वादनाचाही छंद होता.
महाराष्ट्राचे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याची परंपरा त्यांचे तीन चिरंजीव आनंद, मिलिंद आणि दिनकर शिंदे यांनी पुढे नेली. आनंद-मिलिंद या जोडगळीने तर आपल्या गीतांनी महाराष्ट्राला अक्षरश: ठेका धरायला लावलं आहे. आनंद यांच्याप्रमाणेच दिनकर शिंदे सुद्धा गुणी गायक म्हणून सर्व परिचित आहेत. त्यांची अनेक लोकगीतं आणि आंबेडकरी गीतं आजही मराठी मनावर रुंजी घालतात. आनंद यांच्याप्रमाणे दिनकर यांनाही गायक म्हणून नावारुपाला येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अथक मेहनत घ्यावी लागली.
सार्थक शिंदे यांनी आपले आजोबा प्रल्हाद शिंदे, चुलते आनंद शिंदे, मिलिंद शिंदे वडील दिनकर शिंदे यांच्याकडून गायकीची प्रेरणा घेतली. गायनाचा वारसा वडिलोपार्जित असला तरी सार्थक यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख गायनाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सार्थक शिंदे यांच्या निधनामुळे अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
“सार्थक शिंदे…
भावा लवकर exit घेतलीस रे
तुला अजुन खुप उंच भरारी घ्यायची होती स्वबळावर.
🥲💐
शेवटचा जयभीम…!”
– शमिभा पाटील (नेत्या, वंचित बहुजन आघाडी)