
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाच्या निवडणुकीच्या इतिहासात या पक्षाच्या उमेदवाराला बऱ्याच वर्षानंतर खटारा अर्थात बैलगाडी या चिन्हाऐवजी शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. “शेकाप आणि खटारा” हे निवडणूक चिन्ह जणू समीकरण बनले असताना शिट्टी हे चिन्ह मिळाल्याने त्याचा फटका बसेल का? असे प्रश्नचिन्ह अनेकजण उपस्थित करत आहेत. मात्र चिन्ह बदलाचा शेकापला पूर्वानुभव आहे.
भाई गणपतराव देशमुख यांनीही यापूर्वी सायकल तसेच कपबशी या चिन्हांवर निवडणूक लढवली होती आणि ती जिंकलीही होती. चिन्हापेक्षा पक्षाच्या विचारधारेवर आणि नेत्यावर ठाम असलेला एकगठ्ठा मतदार शेकापकडे असल्याने चिन्ह बदलले असले तरी त्याचा कोणताही परिणाम न होता शेकापला फायदाच होतो असा इतिहास आहे.
भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल 13 पंचवार्षिक निवडणुका सांगोला विधानसभा मतदारसंघातून लढविल्या. त्यापैकी 11 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये त्यांनी घवघवीत मते घेत यश संपादन केले होते.
या 13 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक वेळा खटारा अर्थात गाडी हे चिन्ह घेऊन बाहेर गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवली मात्र काही वेळा त्यांना निवडणूक आयोगाकडून खटारा हे चिन्ह मिळू शकले नाही. दोन वेळा कपबशी या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. कपबशी चिन्ह असताना एका वेळेस शहाजी बापू पाटील यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत कपबशी चिन्हावरच भाई गणपतराव देशमुख हे भरघोस मतांनी विजयी झाले. भाई गणपतराव देशमुख यांना एका वेळेस सायकल हेही निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्या चिन्हावरही त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
प्रथमच शिट्टी चिन्ह
शेतकरी कामगार पक्षाला या 2024 च्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख हे उमेदवार आहेत. ते आपल्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. पक्षाच्या खटारा या पारंपरिक चिन्हाविना ते शिट्टी या चिन्हाद्वारे निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिट्टी हे चिन्ह सर्वसामान्य मतदारांना ज्ञात, परिचित आणि लोकप्रिय असल्याने हे चिन्ह मतदारांच्या लक्षात राहील असेच आहे. त्यामुळे त्यांना या चिन्हाची कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही.