सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे मनोमिलन घडून आले. जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. उमेदवारीची घोषणा करताच डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जनतेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.
शेतकरी कामगार पक्षाचा भव्य मेळावा मार्केट यार्ड येथील मैदानावर झाला. यावेळी डॉ. अनिकेत देशमुख, बाईसाहेब देशमुख उपस्थित होते.
लढेंगे जितेंगे, बाबासाहेब देशमुख को लाल सलाम या घोषणा जयंत पाटील यांनी दिल्या.. जयंत पाटील म्हणाले की, अनिकेत देशमुख यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. महाविकास आघाडी भक्कम राहणार आहे. शरद पवार यांनी शेकाप पक्षाला सांगोला येथे मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यावर खूप प्रेम केले. त्यांच्या पश्चात डॉ. बाबासाहेब देशमुख हे त्यांची परंपरा चालवतील.
शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, “देशमुख कुटुंबियातील वाद संपवावा अशी तालुक्यातील लोकांची मागणी होती. आमच्यात वाद नव्हताच. आम्ही एकच आहोत. आता तुमची जबाबदारी आहे. पुढे कितीही रंगी लढाई होवो. शेकापचा विजय निश्चित आहे. माझा कार्यकर्ता फाटका आहे. मात्र तो किती निष्ठावान आणि जिद्दी आहे ते दाखवण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील लोकांच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. अनेक शाळांच्या इमारती पडल्या आहेत. दवाखान्यांची अवस्था भयानक आहे. दवाखान्यात जनावरे बांधली जात आहेत. मागील दहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. निवडून आल्यावर तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.