सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना प्रमुख उमेदवारांनी मोठमोठ्या सभा घेऊन गर्दी जमवून माहोल निर्माण केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख या बंधूंनी प्रचारात रंगत आणली आहे.
सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानासाठी फक्त पाच दिवस उरले आहेत. या पाच दिवसात रात्रीचा दिवस करून कार्यकर्ते नेते आपापल्या नेत्याचा आपल्या परीने प्रचार करताना दिसून येत आहेत.पक्षाच्या जाहीर सभेत आरोपांच्या फैरी झडत असून असल्याचे दिसून येते. शेकापचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी प्रत्यक्ष नाव न घेता शिवसेनेच्या उबाठा उमेदवारावर “तुम्हाला आबासाहेबांनी साखर कारखान्याचे चेअरमन केले. पण तुम्ही त्या साखर कारखान्याचे पत्रे ठेवले नाहीत आणि तुम्ही मतदार संघात एमआयडीसीच्या वल्गना करीत आहात.”
असा समाचार घेतला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदीप मिसाळ पाटील यांनी “तुमच्या शाळेवरील अनेक शिक्षकांना वेठबिगार पद्धतीने राबवून घेऊन त्यांच्या हातात त्यांनी केलेल्या श्रमाचे दाम मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून आरोपांची राळ उडवून दिली आहे.
गेल्या ५५ वर्षापासून शेकापची सत्ता मतदारसंघावर आहे परंतु विकास कामे व निधी आणण्यास शेकाप नेतृत्व कमी पडले असल्याचे शिवसेनेचे आम. शहाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत, शेकापने फक्त पाणी परिषदा घेतल्या, प्रत्यक्षात पाणी आणण्यास ते असमर्थ ठरले आहेत, १९९९ साली उजनीचे दोन टीएमसी पाणी सांगोला मतदारसंघासाठी मंजूर झाले, तीन वेळा साळमुख येथे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोण शिला बसविली, उद्घाटन केले परंतु या पाणी योजनेस भरीव निधी प्राप्त करू शकले नाहीत असाही आरोप केला जात आहे.तर ऊबाठा उमेदवाराने मी गणपतराव देशमुख यांना अनेक निवडणुकीत सहकार्य केले आहे त्यामुळे मीच त्यांचा खऱ्या अर्थाने वारस असल्याचे सांगितले .
त्यास प्रत्युत्तर म्हणून शेकापने तुम्ही मागील विधानसभा निवडणुकीत मी शेकापमधे प्रवेश करतो पण मला उमेदवारी द्या अशी याचना करूनही गणपतराव देशमुख यांनी त्यांना प्रवेश दिला नाही,आयुष्यभर आबांसाहेब स्वावलंबी जीवन जगले, त्यामुळे तुम्ही त्यांची कसली सेवा केली ? असा सवाल उपस्थित केला. पक्ष बदलूनी शेकापवर टीका करू नये असा टोला डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी लगावला आहे.
विद्यमान आमदारांनी जरी निधी आणला असला तरी तो कागदावर असून प्राप्त झालेल्या निधीमधून टक्केवारी घेऊन कॉन्ट्रॅक्टरचे भले केले व ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, काही कामे तर कागदोपत्री दाखवली आहेत. या कामाचा ताळमेळ लागत नसल्याने तालुक्याचा विकास खुंटला आहे, उजनी सिंचन योजना, सांगोला बायपास रस्ता, भुयारी गटार योजना,नगरपरिषद प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत, ईदगाह मैदान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, विविध ठिकाणचे रस्ते,यासह विविध कामासाठी आलेला कोट्यावधी रुपयाचा निधी या आम. शहाजी बापू पाटील यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी होणाऱ्या टक्केवारीच्या आरोपामुळे ते पुरते घायाळ झाले असल्याची चर्चा आहे.
येत्या चार-पाच दिवसात आरोप प्रत्यारोप वाढणार असून या आरोप प्रत्यारोपामुळे प्रचारात रंगत आली आहे त्यामुळे मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याचे दिसून येते.