
चर्चा तर होणारच / डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्याचे राजकारण 1990 पर्यंत पक्षीय राजकारण होते. त्यानंतर ते व्यक्तिकेंद्रित झाल्यामुळे तालुक्यातील राष्ट्रीय पक्ष असलेले भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गट पक्षाचे अस्तित्व संकटात आहे! तर शेकाप, शिवसेना शिंदे व ठाकरे गट या प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वही त्या पक्षातील नेत्यांमुळे तग धरून असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी निकराची झुंज देत सांगोला विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा लाल बावटा फडकवल्याने तालुक्याच्या पक्षीय राजकारणात शेकाप अव्वल ठरला असून इतर पक्षांचा मात्र सूर हरवला असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत आहे. मात्र या पक्षाचे अस्तित्व हे तालुक्यात कागदावरच आहे. भाजपा पक्ष 2014 पासून जिल्ह्यात प्रबळ होत गेला, परंतु तालुक्यात मात्र या पक्षाचे अस्तित्व नाममात्र राहिले आहे. दुसऱ्या पक्षातून तयार झालेले कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यानंतर नेते बनले, जिल्हाध्यक्ष बनले. मात्र, या दोघांना तालुक्यात संघटन बांधणी करता आली नाही. सत्तेत देखील सहभाग घेता आला नाही.
तालुक्यात 76 ग्रामपंचायतीतील वासुद ग्रामपंचायत सोडली तर इतर ग्रामपंचायतीवर भाजपला सत्ता मिळवता आली नाही. तीच परिस्थिती सहकारी संस्थामध्ये आहे. गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करणे महत्त्वाचे आहे. परंतु ते झाले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व नाममात्र राहिले आहे. कार्यकर्ता घडायला पंधरा ते वीस वर्षे लागतात. पूर्वी पक्षात कार्यकर्ते घडत होते. आता तयार झालेले कार्यकर्ते भाजपमध्ये घेत आहेत. ही भाजपची अवस्था आहे.
काँग्रेस विरुद्ध शेकाप
तालुक्यात पूर्वी शेकाप म्हणजे समिती म्हटले जात होते. समिती विरुद्ध काँग्रेस अशी लढत ग्रामपंचायतपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुकीत होत होती. म्हणजे त्या काळात व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व होते. पक्षातर्फे कोणीही निवडणूक लढवली तर ते विजय होत असे. परंतु 1990 मध्ये माजी आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून तालुक्यातील पक्षीय राजकारण संपले व जातीय आणि व्यक्तीकेंद्रीत राजकारणाला सुरुवात झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले. 1978 साली काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर फूट पडली. त्यावेळी इंदिरा काँग्रेस पक्षातर्फे मुस्लिम समाजाचे इब्राहिम इनामदार व दलित समाजाचे काशिनाथ काटे व बहुजन समाजाचे ईश्वर बाळा पाटील या नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. विधानसभेच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख पाच हजार मताच्या फरकांनी विजयी होत होते. परंतु सध्याच्या राजकारणात 2009 पासून आघाडी व युतीचे राजकारण सुरू झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नाममात्र राहिले तर 2024 ला या पक्षाचे संपूर्ण अस्तित्व संपुष्टात आले. प्रा.पी. सी. झपके यांच्यामुळे काँग्रेस पक्ष थोडाफार तग धरून होता. परंतु तोही 2024 च्या विधानसभा निवडणुकीत संपल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीचीही तीच अवस्था
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गटाचीही अशीच अवस्था झाली आहे. त्या पक्षाला तालुका कमिटी नाही व नेताही राहिला नाही. कारण ज्यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व दिले त्यांनी पक्ष वाढीपेक्षा स्वतःचा विचार मंच वाढविला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बघून सोईच्या पक्षात उडी मारली. राष्ट्रवादी पक्ष हा या ना त्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहिला असल्याने सत्ता असेल तरच हा पक्ष जिवंत वाटतो, अशी त्या पक्षाची अवस्था आहे.
शेकापचा वाढता जनाधार
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने राज्यात पाच ठिकाणी उमेदवार दिले होते. मात्र सांगोला मतदार संघ वगळता इतर ठिकाणी या पक्षाला यश मिळवता आले नाही. पक्षाचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख व त्यांच्यानंतर आलेले डॉ.अनिकेत व आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यामुळे त्या पक्षाचे अस्तित्व टिकून राहिले आहे.
आ. बाबासाहेब देशमुखांचे नेतृत्व तालुक्याने स्वीकारले
डॉ. आ. बाबासाहेब देशमुख हे राजकारणात नवखे असूनही केवळ त्यांच्या सर्वसमावेशक विचारांमुळे त्यांचे नेतृत्व तालुक्याने स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी “बाबासाहेब प्रती आबासाहेब” ही घोषणा समाजमनात रुजविली होती. त्याचा मोठा परिणाम निवडणुकीत झाल्याचे दिसून आले.
एकंदरीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्वच नेत्यांची कुणाची किती ताकद आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून आले. त्यात शेकापने बाजी मारली असल्याचे दिसून आले.
हेही वाचा