
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जवळा गावात आज शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी आणि असंख्य मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची या सभेला प्रमुख उपस्थिती असेल.
इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ त्यांनी ढवळून काढला आहे. मागील चार दिवसात त्यांनी जणू तालुक्यातील राजकीय वातावरण तापवून सोडले आहे. काल बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिवसभर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघातील विविध गावांमध्ये जंगी सभा घेतल्या. आज जवळा येथे डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांच्या बरोबरीनेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेही या सभेत उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे अपक्ष आणि बंडखोर उमेदवार आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत सांगोला येथे केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हेच स्वतः डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभेसाठी जवळा गावात येत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळा गावात शेकापचा धमाका
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जवळा गावात होत असलेल्या या सभेकडे तालुक्यात लक्ष लागून राहिले आहे. जवळा हे गाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानले जात होते. मात्र आता या गावाचे लोकप्रिय नेते दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मशाल हातात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. खुद्द त्यांच्याच गावात ही विराट जाहीर सभा होत असल्याने या सभेला राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
जवळा गावातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात या सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहेत. किमान 30 हजारहून अधिक लोक बसू शकतील एवढी मोठी बैठक व्यवस्था या चौकात तसेच चौकाला जोडणाऱ्या रस्त्यांवर करण्यात आली आहे.
जवळा गावात तसेच गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक वाड्यावर भाई गणपतराव देशमुख हे हयात असल्यापासून शेतकरी कामगार पक्षाला मानणारा हजारोंचा वर्ग आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह तरुण वर्गाला ऊर्जा देऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कामाला लावले आहे. मागील महिन्याभरापासून या भागातील कार्यकर्ते देशमुख यांच्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. जवळा गावात होणारी ही सभा ऐतिहासिक ठरली पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दुपारी ठीक एक वाजता या सभेला सुरुवात होईल.
मोहिते-पाटील काय बोलणार?
डॉ. बाबासाहेब देशमुख हे अपक्ष आणि बंडखोर उमेदवार आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत सांगोला येथे केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हेच स्वतः डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभेसाठी जवळा गावात येत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.