सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
सोलापूर जिल्ह्यात चिन्हामुळे निवडणुकीला रंगत आली आहे. जिल्ह्यातील अकरापैकी सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. या सहाही ठिकाणी अपक्ष आणि काही पक्षांच्या उमेदवारांना ट्रॅम्फेट चिन्ह मिळाल्याने तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
सर्वच मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ‘ट्रम्पेट’ चिन्हाने घातलेल्या गोळाने सोलापुरात शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घोर लागला आहे.
मराठी भाषांतर रद्द तरीही घोर
लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. चालू विधानसभा निवडणुकीत हा संभ्रम टाळण्यासाठी ‘ट्रम्पेट’चे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्याची मागणी पक्षाने केली होती. पक्षाच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द केले आहे. ही मागणी मान्य झाल्यामुळे पक्षाला दिलासा मिळाला. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशिवाय तुतारीसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवारांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोणत्या मतदारसंघात ट्रम्पेट?
मोहोळ : मोहोळ राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे हे उमेदवार पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊन उभे आहेत. परंतु त्यांच्या विरोधात अनिल नरसिंह आखाडे हे अपक्ष उमेदवार तुतारीसुदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे आहेत.
माळशिरस : माळशिरसमध्ये याच पक्षाचे उत्तम जानकर यांच्या विरोधात गणेश अंकुश नामदास या अपक्ष उमेदवाराने ट्रम्पेट हे तुतारीसदृश चिन्ह घेतले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा : या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सुभाष सावंत हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भविष्य आजमावत आहेत. याशिवाय काँग्रेसचे भगीरथ भारत भालके यांचीही उमेदवारी कायम आहे. त्याचा फटका भालके यांना बसण्याची चिन्हे दिसत असतानाच त्यांच्याच पक्षाचे चिन्हसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन पंकज देवकते यांनी रासपकडून उमेदवारी आणली आहे. त्यामुळे तेथील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
माढा: माढ्यामध्ये ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बडे साखरसम्राट अभिजित पाटील यांचे तगडे आव्हान आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या चिन्हाच्या सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन राजेश तानाजी खरे हे उमेदवार उभे आहेत.
करमाळा : करमाळा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील यांचे आव्हान आहे. परंतु अन्य उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेले अशोक ज्ञानदेव वाघमोडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) यांच्या उमेदवारीमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो.
सोलापूर शहर उत्तर : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महेश विष्णुपंत कोठे यांना संधी दिली आहे. परंतु कोठे यांना जुबेर सलीम पटेल या अपक्ष उमेदवाराच्या ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.