सांगोला /प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठे यश आले. माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी मोठी एमआयडीसी, मेडिकल कॉलेज ,इंजिनिअरिंग कॉलेज, व्यावसायिक कॉलेज तसेच मोठमोठ्या कंपन्या आणून तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्त्वपूर्ण काम योजले आहे. येत्या वर्षभरात तालुक्यात हरितक्रांती करण्याचे काम हाती घेतले आहे. तालुक्यातील एक गावही पाण्यापासून वंचित ठेवले नाही. मतदारांनी आपले पवित्र मत देऊन पाच वर्षे पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी. विजयाचा गुलाल हा आपलाच आहे. महायुती सरकारने राज्यात केलेल्या विकास कामामुळे पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सांगोला तालुक्यातील कटफळ, इटकी, खवासपूर ,लोटेवाडी, अचकदाणी, बागलवाडी ,लक्ष्मीनगर ,खिलारवाडी, गायगव्हाण, महिम येथे प्रचाराच्या कॉर्नर सभा घेण्यात आल्या.
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले , तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी व बेरोजगारी संपवण्यासाठी एमआयडीसी आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे .
राजकारणात आल्यापासून तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी माझी राजकीय लढाई सुरू आहे. मी केलेली विकास कामे पुस्तक रूपाने जनतेसमोर मांडली आहेत. विकास कामांचा सखोल अभ्यास करून जनतेने पुढील पाच वर्ष आमदारकीची संधी द्यावी. तालुका सुजलाम सुफलाम करून दाखवतो. असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, भीमशक्ती संघटनेचे राज्यअध्यक्ष विजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.महादेव कांबळे शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे ,शिवसेनेचे ज्येष्ठनेते सुभाष इंगोले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते,ॲड. विजय खांडेकर, शंतनू खिलारे, मारुती जाधव यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यादरम्यान मनोगत व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की बापूंनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे .विरोधकांनी त्यांच्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोणते काम केले ते जनतेसमोर जाहीरपणे सांगावे.
या स्वार्थीपणाला जनता माफ करणार नाही. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केले.बापूंनी 35 वर्षे पाण्यासाठी संघर्ष केला. स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात कोणतेच मोठे काम न करता आपली खुर्ची टिकवली. आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी देऊया बापू महायुती शासनामध्ये निश्चितपणे नामदार होतील. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी प्रत्येक गावातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
यावेळी प्रचार सभेसाठी प्रा.संजय देशमुख, भाजपचे जेष्ठनेते शशिकांत भाऊ देशमुख,भाजपचे तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर ,उपाध्यक्ष अनिल चौगुले, भाजपचे युवा कार्यकर्ते विनायक बाबर , लहुजी शक्तीसेना तालुका अध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे आदी मान्यवर, तसेच महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी ,आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
चौकट: सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेप्रसंगी मोठ्या संख्येने समुदाय उपस्थित होता .जो उमेदवार भविष्यात तालुक्याचा विकास करू शकतो अशा उमेदवाराला आपण संधी द्यावी. सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेसाठी महिला भगिनी व युवावर्गाचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. आमदार शहाजीबापू पाटील यांना आपली ताकद द्या. बापू तालुक्याला वैभवच्या शिखरावर पोहोचवतील.
तालुक्यात या निवडणुकीत राजकीय चित्र फार वेगळे आहे .विरोधात दोन उमेदवार उभे आहेत .त्यांनी केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडावा व मी केलेल्या विकास कामाची कार्यपुस्तिका पहावी. विचार करून मतदारांनी पुन्हा एकदा मला आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.