जुजारपूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
मी केवळ अडीच वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. तालुक्यातील अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प, प्रश्न मार्गी लागले. कोरोनामुळे मला फक्त अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. मात्र माझी मापे काढण्याचे काम काही विरोधक करत आहेत. दीपक आबांनी त्यांच्या विधान परिषदेच्या काळात 50 कोटी रुपये तरी निधी आणला का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे आव्हान शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.
जुजारपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे नेते श्रीकांत देशमुख, जयश्री नागने, दादासाहेब लवटे, शिवसेना मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष दीपक आयवळे आदी उपस्थित होते.
आमदार शहाजी बापू पाटील पुढे म्हणाले की, केवळ सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मी आज पर्यंत आठ वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. इथल्या जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यांची सेवा केली आहे. भाई गणपतराव देशमुख हे हयात असताना बाबासाहेब देशमुखांनी एकदा तर त्यांचा प्रचार केला का? त्यांना राजकारणात यायचे होते तर त्यांनी आबासाहेब असताना त्यांच्याकडून राजकारण, तालुक्यातील प्रश्न समजून घ्यायला पाहिजे होते.
भाई गणपतराव देशमुख हे हयात असताना बाबासाहेब देशमुख यांना तालुक्यातील कोणीही ओळखत नव्हते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोलकत्ता गाठले. आबासाहेब गेल्यावर मात्र त्यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली. केवळ दीड वर्षापासून ते या तालुक्यात सक्रिय आहेत. फक्त दीड वर्षाच्या काळात त्यांना आमदार व्हायचे स्वप्न पडू लागले आहे. मी तब्बल 40 वर्षे संघर्ष करत आमदारकी खेचून आणली. इतका मोठा त्याग, परिश्रम कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून केले. आमदार होणे एवढे सोपे नाही ते बाबासाहेब देशमुख यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.
दीपक आबांना मी माझ्या आमदारकीच्या काळात प्रति आमदार म्हणून सन्मानाची वागणूक दिली. असे असतानाही त्यांनी स्वता निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि ते निवडणूक लढवत आहेत.
विधान परिषदेचे आमदार म्हणून ते पाच वर्षे जिल्ह्यात कार्यरत होते. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी पन्नास कोटी रुपये तरी निधी आणून विकास कामे केली का! या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. हे उत्तर ते देऊ शकणार नाहीत. कारण पाच वर्षे संधी मिळून हे त्यांना काही करता आले नाही आणि आता ते तालुक्याच्या विकासाची गोष्ट करीत आहे.
माझी शेवटची निवडणूक
राजकीय क्षेत्रात एवढा प्रदीर्घ संघर्ष करत मागील वेळेस मी आमदारकी खेचून आणली. कोरोनामुळे मला फक्त अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या अडीच वर्षांच्या काळात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने तब्बल 500 कोटी रुपयांचा निधी आणून तालुक्यातील अनेक विकास कामे केली. अनेक कामे अजूनही सुरू आहेत. ही उर्वरित कामे माझ्या डोळ्यात देखत मार्गी लागणे हे माझे स्वप्न आहे. पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला असला तरी या पाण्याच्या योजनांची काही कामे मला पूर्ण करायची आहेत. सांगोला तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करायची आहे.
तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. ऊसतोडी किंवा इतर रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखायचे आहे. ही सर्व कामे मला माझ्या डोळ्यात देखत करण्यासाठी यावेळेस तालुक्यातील जनतेने शेवटची संधी द्यावी. ही माझी शेवटची निवडणूक असेल इथून पुढे मी कधीही निवडणूक लढवणार नाही. तरुणांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळावी त्यासाठी मी स्वतःहून हा माझा वैयक्तिक वैचारिक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयावर मी ठाम राहणार आहे.
त्यामुळे तालुक्यातील जनतेने माझ्या या शेवटच्या निवडणुकीला कोणतेही गालबोट न लावता मला भरघोस मतांनी निवडून द्यावे. तालुक्याचे नंदनवन करेन. तालुक्यात सर्व गावांमध्ये सुख सुविधा निर्माण करीन. बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे माझे स्वप्न आहे ते स्वप्नही हे आपण मला पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्यावर पूर्ण करेन.
हटकर समाजाचे प्रश्न मार्गी लावू. मला काम करण्याची पुन्हा एकदा संधी द्या.