सांगोला : डॉ. नाना हालंगडे
सांगुला इदानसभा इलेक्शनसाठी पाणीदार आमदार बापू, माजी पाणीदार आमदार आबा आन् बाबासाहेब या तीनही खमक्या पुढाऱ्यांनी आर्ज भरला. या आर्ज भरण्याच्या निमित्तानं दिवाळी आदिच अनेकांची दिवाळी झाली..
भावभावकी आणि उलीस कार्येकरतं
पैसा – पाण्याची आबदा उटल्यालं बाबासायेब लई गर्दी जमवण्याच्या भानगडीत दिसलं न्हाय. त्यांनी भावभावकी आणि उलीस कार्येकरतं घिवून आर्ज भरून हातायेगळा केला. उरल्याल्या दोन गड्यांनी मातुर लई वंगाळ न्याट केलं.
काय त्या गाड्या, काय ती मान्स!
आपलं लाडकं आबा आर्ज भरणारेत म्हणुनश्यान च्यार दिसपास्न झ्याक तय्यारी सुरू हुती. परतेक वार्ड, गट, गणावाईज मान्स कामाला लागल्याली. लिस्टा तय्यार.. कुणाला किती गाड्या.. कुणाला किती त्याल – पाणी हे आख्खंच्या आख्खं निवेजित हुतं… आखीर सोम्वारचा दिस नवी झळाळी… नवा सूर्य.. नवा उत्साव घिऊनश्यान उगवला. परत्येक गावात, वारडात जीपगाड्या हुब्या… लेकराबाळाला, म्हाताऱ्या कोताऱ्यांना, बाय माणसांना जीपातनी बसवायचं फर्मान… कार्येकरतं आपल्या घरातलं लगीनकार्य समजून या कामाला लागलं हुतं.. तिकडं पेट्रोल पंपावरबी गर्दीच गर्दी… ज्येला जीपत बसायला लाज वाटतीय त्यास्नी पेट्रोलची फुकाट सोय…
व्हानं एका लायनित सांगुल्याच्या दिसनं निगाली… काय त्या गोषणा.. काय त्यो आनंद… कदी नव्हं त्ये आपल्या नेत्याला मत टाकायची संदी मिळत्येय हे त्येंच्या चेऱ्यावर दिसत हुतं… सांगुल्याच्या जय भवानी चौकात चारी बाजूनं मान्स गोळा झाली.. आबानं आपल्या भासनात एका झटक्यात साऱ्या इरोदकांना आडवं केलं… “आबांनी ३० वर्षात काय केलं… हे केलं.. जे तुम्हाला दिसतेय..” आस गर्दीकडं हात दाखवत भासन केलं… सबा संपली.. मान्स जिकडच्या तिकडं झाली… अजून पुन्यांदा कदी जायाला मिळलं या अपेक्षेनं…
पाणीदार पैसा
तिकडं आपल्या पाणीदार आमदार बापूंनी पण चांगलाच जोर लावला हुता.. पाच वर्षात कमावलेली (मिळवलेली) सारी परतिस्टा पणाला लावल्याली दिसली… त्यानीबी तालुक्याच्या काना कोपऱ्यातन गाड्या घोड गोळा केल्याली… तिकडं काय का हूना “हात बळकट करायला जायला लागतंय” या जोमान कारेकर्ते गोषना देत सांगुल्याकडं येत हुती…
एकूण काय तर दिवाळी आदीच अनेकांची दिवाळी झाली… आता उतल्याली दिवाळी अजुन अठरा दिवस मंजी बोटाला शाय लागुसपातूर दिवाळीच दिवाळी हूनार या आनंदात आजचा दिवस गेला..