सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
कावरी बावरी नजर झाली, कोणा कोणाची भेट झाली,जोडणी कोणाची कधी केली, कुजबुज कार्यकर्त्यांची सुरू झाली,एक एक मतांची बोलणी जोर धरू लागली…. आश्र्वासनमाय..
*प्रचारंमंथनाचे नवनीत*… एक मात्र यातून कोणाचा टांगा पलटी होणार की घोडा फरार होणार ? यांच्या चर्चा मात्र जोमाने रंगत आहेत. सांगोला तालुक्यात गेल्यावेळी एकत्र असणारे दोन दोस्त एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तर बालेकिल्लातच सत्तेपासून दरावलेले शेकाप पक्ष विचारांचा वारसा सांगत आजी-माजीविरुद्ध चांगलाच दोन हात करीत आहेत. सध्या प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले असून एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झडत सांगोला तालुक्यात तिरंगी अटीतटीची लढत लागली आहे.तिरंगी सामन्यात मत विभाजनच्या फायद्या – तोट्यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
सांगोला तालुक्यात प्रथमच अतिशय रंगतदार तिरंगी लढत लागली आहे. महायुतीकडून शिवसेना पक्षाने विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना मैदानात पुन्हा उतरवले आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा घोळ अध्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांना सुरुवातीलाच उमेदवारी घोषित केली. शेतकरी कामगार पक्षाने डॉ.बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे-पाटील असले तरी दुसरीकडे शेकाप पक्षासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील प्रचार करीत आहेत. त्यामुळे येथे महायुती किंवा महाविकास आघाडी असा दोन राज्यस्तरीय सामना नसून येथे उमेदवाराच्या पक्षांपेक्षा गटामध्येच सामना रंगला आहे. विधानसभेसाठी नेहमी दुसऱ्यांना पाठिंबा देणारे दिपकआबा साळुंखे-पाटील यावेळी मी समोरच्या दोन्ही उमेदवारांना, त्यांच्या पक्षाला या अगोदर साथ दिल्याने त्यांनी मला एक वेळ मला संधी द्यावी असे सांगत विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या मतांच्या गोळजाबेरीजेवर येथील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. साळुंखे-पाटील स्वतःच्या गटासह आमदार शहाजीबापू पाटील व शेकाप पक्षाचे किती मते घेणार यावरच विजयाचे सूत्र अवलंबून असणार आहे. सध्या प्रचाराचा सामना चांगलाच तापला असून तिघेही उमेदवार विकासाच्या नावाखाली एकमेकांविरोधात आरोपाच्या फैरी झाडत आहेत.
*मतविभागणीचा फायदा नेमका कोणाला?*
या अगोदरच्या निवडणुकांमध्ये उमेदवार जरी जास्त असले तरी सामना हा दुरंगीच लढला जात होता. माजी आमदार साळुंखे-पाटील दोन्हीपैकी कोणत्यातरी एका पक्षाला पाठिंबा देत असल्यामुळे येथे दुरंगी लढती पाहिल्या गेल्या आहेत. परंतु यावेळी साळुंखे-पाटील प्रथमच मैदानात असल्याने तिरंगी लढतीचा नेमका फायदा-तोटा कोणाला होणार ? याकडे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
दिपकआबांचा फायदा शेकापच्या डॉक्टर देशमुख यांना होईल असे ठोसपणे शेकापचे कार्यकर्ते विजय आमचाच होईल असे सांगत आहेत तर दिपकआबांचा अनेक वर्षांचा दोस्ताना शेकापसह असल्यामुळे त्यांना त्या पक्षातील अंतर्गत घडामोडी चांगल्याच माहित आहेत. ते शेकाप पक्षातील मते जास्त घेतील व याचा फायदा शहाजीबापूंला पुन्हा आमदार करण्यात होईल असे शिवसेनेच कार्यकर्ते बोलत आहेत. दिपक आबांचा नवीन राजकीय बॉम्ब विजयापर्यंत कसा पोहोचू शकतात याचा आराखडाच त्या गटातील अनेक जण मांडत आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत नेमका कोणाला फायदा होईल याची चर्चा तालुक्यात जोर धरत आहे.
*राजकीय आघाडीवर*
विधानसभेच्या राजकीय इतिहासात प्रथमच तिरंगी अटीतटीची लढत
विधानसभेसाठी नेहमी दुसऱ्याला पाठिंबा देणारे दिपकआबा साळुंखे-पाटील प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात
महाविकास आघाडीमधून साळुंखे-पाटलांना अधिकृत उमेदवारी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील करताहेत शेकाप पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार
शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरूनच शेकापच्या उमेदवाराचा करतोय प्रचार : धैर्यशील मोहिते पाटलांचा खुलासा
आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील या दोस्तांमध्येच रंगली राजकीय कुस्ती
महाविकास आघाडीत बिघाडी असली तरी उमेदवारांच्या एकमेकांविरुद्धच्या फायद्या-तोट्यावरच जय-पराजय अवलंबून
मागील निवडणुकांमधील मतदान*
2014
एकूण मतदार संख्या – 2 लाख 71 हजार 376
झालेले मतदान – एक लाख 98 हजार 197
प्रमुख उमेदवार – मिळालेली मते
स्व. गणपतराव देशमुख (शेकाप) – 94 हजार 374
शहाजीबापू पाटील (शिवसेना) – 69 हजार 150
श्रीकांत देशमुख (भाजप) – 14 हजार 074,
शेकापचे स्व. गणपतराव देशमुख हे 25 हजार 224 मतांनी विजयी.
*2019
एकूण मतदार संख्या – 2 लाख 93 हजार 969
झालेले मतदान – 2 लाख 15 हजार 468
प्रमुख उमेदवार – मिळालेली मते
शहाजीबापू पाटील (शिवसेना) – 99 हजार 464
डॉ.अनिकेत देशमुख (शेकाप) – 98 हजार 696
राजश्री नागणे पाटील (अपक्ष) – 4 हजार 484
शिवसेनेचे शहाजीबापू पाटील 768 मतांनी विजयी
2024 निवडणूक –
एकूण उमेदवार संख्या – 13
एकूण मतदार संख्या – 3 लाख 33 हजार 493
प्रमुख उमेदवार – पक्ष
दिपकआबा साळुंखे पाटील – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
शहाजीबापू पाटील – शिवसेना
डॉ. बाबासाहेब देशमुख – शेतकरी कामगार पक्ष