सांगोल्यात सतराव्या निवडणुकीतून कोण होईल आमदार?
डॉ.बाबासाहेब, आबा पहिल्यांदाच रिंगणात

राजकीय वार्तापत्र/डॉ.नाना हालंगडे
महायुतीतील शिंदे सेनेचे आमदार शहाजी पाटील हे 1990 पासून वेगवेगळ्या पक्षातर्फे आठ वेळा निवडणूक लढवली व 1995 व 2019 ला विजयी झाले.आता पुन्हा 2024 ला निवडणूक लढवीत असून त्यांना महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे दीपक साळुंखे पाटील व आघाडीतीलच शेकापचे बाबासाहेब देशमुख हे दोघे प्रथमच निवडणूक लढवून जबरदस्त आव्हान दिल्याने या तिरंगी लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सांगोला मतदारसंघ हा 1962 पासून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. या मतदारसंघातून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तेरा वेळा निवडणूक लढविली व अकरा वेळा विजयी झाले होते 2019 ला गणपतराव देशमुख यांनी वयोमानामुळे निवडणूक लढवली नव्हती.त्यांनी त्यावेळी नातू डॉ.अनिकेत देशमुख यांना उभे केले होते.त्यावेळी 768 या अल्पमताने शहाजी पाटील विजय झाले होते.आता डॉ.अनिकेत यांचे चुलतबंधू व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवीत आहेत.गणपतराव देशमुख यांच्या पश्चात डॉ.बाबासाहेब हे प्रथमच निवडणूक लढवीत आहेत.डॉ.अनिकेत व डॉ.बाबासाहेब हे दोघे बंधू यांनी शेकापच्या प्रचाराची आघाडी सांभाळली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघात 1952 पासून 16 निवडणुका झाल्या असून, 2024 ची 17 वी निवडणूक आहे. 16 निवडणुकीमध्ये 13 वेळा धनगर समाजाचे तर तीन वेळा मराठा समाजाचे आमदार विजयी झालेले आहेत. म्हणजेच या मतदारसंघात धनगर विरुद्ध मराठा या दोन जातीतच निवडणूक होत आली आहे. परंतु या दोन्ही जातीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रबळ असा त्याच दोन जातीचे उमेदवार कधी उभारलेले नाही परंतु यावेळी मात्र मराठा समाजाचे मातब्बर नेते दीपक साळुंखे पाटील हेही मैदानात उतरल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे.
यापूर्वी मराठा समाजाचे भाजप तर्फे श्रीकांत देशमुख व डॉ.गणपतराव मिसाळ यांनी शहाजी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु फारसा प्रभाव दिसून आला नाही. यावेळी मात्र दीपक साळुंखे पाटील यांनी जबरदस्त आव्हान दिले आहे ते माजी विधान परिषद सदस्य आहे. त्यांचे वडील स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांनी 1972 ला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता. दीपक साळुंखे पाटील यांनी गेली तीस वर्ष मतदार संघात मतदाराशी नाळ जोडलेली आहे. ती नाळ गणपतराव देशमुख व शहाजी पाटील यांच्याशी मैत्रीमुळे त्यांनी सातत्याने संपर्क ठेवून जनतेची कामे केली आहेत.त्यांना वैयक्तिक मानणारा एक प्रभावशाली गट तयार केलेला आहे. त्यामुळे मराठा समाजात मताची विभागणी होण्याची शक्यता आहे.तसेच शेकाप विरोधी अल्पसंख्यांकांची एक गठ्ठा मते शहाजी पाटील यांना यापूर्वी मिळत असल्याने ते नेहमी 70 ते 80 हजार मताचे मालक होत आहेत.परंतु ती परिस्थिती आज राहिलेली नाही. अल्पसंख्याकांची एक गठ्ठा मताची विभागणी होण्याची शक्यता आहे.
गणपतराव देशमुख यांना मानणारा धनगर मराठा व अल्पसंख्यांक समाज त्यांच्या हयातीत जो मतदार होता.तो आजही डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे असल्याचे दिसत आहे.इकडे तिकडे गेले असले तरी पारंपारिक मतदार आहेत तेथेच आहेत. विधानसभेची निवडणूक असो अथवा कोणती निवडणूक असो इकडे तिकडे पक्षांतर करणाऱ्यांची सुगी असते काही सुपारी बहाद्दर कार्यकर्ते असतात. इकडे तिकडे करणारे हे एकाच पक्षातील नाहीत सर्वच पक्षात हे गावोगावी दिसून येत आहे.त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे तीनही उमेदवार मत व्यक्त करीत आहेत.
सदरची निवडणूक ही दोन पाटील व एक देशमुख या तिघांनाही म्हणावी तशी सोपी नसून येणारे पाच दिवस तिघांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.दरवेळी शहाजी पाटील पराभूत होत असे व त्याचे कारण पैसा कमी पडल्याने पराभूत झालो असे सांगत असे,यावेळी पैसा भरपूर आहे परंतु कार्यकर्ते मात्र कमी झाले आहेत.मतदार पूर्वीप्रमाणे राहिला का नाही ही पाहण्याची वेळ आली आहे. तर साळुंखे पाटील यांच्याकडे पैसा आहे कार्यकर्ता ही गावोगावी आहे परंतु मतदार काय करतो हे पहावे लागणार आहे. तर डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याकडे नेते,कार्यकर्ते व मतदार आहेत.परंतु पैसा मात्र कमी आहे.त्यामुळे मतदार राजा कशी भूमिका घेतो हे मतमोजणी दिवशी समजून येणार आहे.
विद्यमान आमदार शहाजी पाटील यांनी 5 हजार कोटीची विकास कामे केली आहेत. गणपतराव देशमुख यांनी ही साठ वर्षात सांगोला मतदार संघाचा विकासाचा चेहरा मोहरा बदलला आहे. तर दीपक साळुंखे पाटील यांनी दोघांच्या मदतीने व स्वतःच्या ताकदीवर विकास कामाबरोबर वैयक्तिक कामेही मोठ्या प्रमाणात केल्याने मतदार राजा तिघांपैकी कोणावर शिक्कामोर्तब करतो हे मतमोजणी दिवशी समजून येणार आहे.सध्या तिघांनी ही प्रचारात आघाडी घेतली आहे.