सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात वाळू माफियांचे धाडस वाढले आहे. चक्क पोलिस पाटलास मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. जवळा गावात शासकीय कर्तव्य पार पाडत असताना वाळू माफियाने पोलिस पाटील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून भर चौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेने सांगोला तालुका हादरला आहे.
याप्रकरणी पोलिस पाटील अशोक सुबराव बुरंगे (रा. बुरंगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बापू तुकाराम बुरंगे (रा. बुरंगेवाडी) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अशोक बुरंगे हे बुरंगेवाडी गावचे कामगार पोलिस पाटील म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे आगलावेवाडीचाही अतिरिक्त कार्यभार आहे. दरम्यान, रविवार ८ रोजी सायंकाळी ६:४८ च्या सुमारास अज्ञातांनी फोनवरून आगलावेवाडी गावाच्या हद्दीत चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिस पाटील अशोक बुरंगे यांनी मंडलाधिकारी विजयकुमार जाधव यांना माहिती दिली.
रात्री १० च्या सुमारास आरोपी बापू तुकाराम बुरंगे (रा. बुरंगेवाडी) याने पोलिस पाटील अशोक बुरंगे यांना मोबाइलवर फोन केला. “तू कुठे आहेस, तू आगलावेवाडी गावात कशाला गेला आहेस, तुला वाळू संबंधित कारवाई करण्याचा कोणी अधिकार दिला, कशाला स्टंट करतोस” असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
या प्रकारानंतर पोलिस पाटील अशोक बुरंगे हे जवळा गावात गाडीतून खाली उतरून घराकडे जाण्यास निघाले असता आरोपी अशोक बुरंगे याने “तुला जास्त मस्ती आली काय?” असे बोलून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाळू माफियांचे एवढे धाडस?
सांगोला तालुक्यात वाळू माफियांचे धाडस वाढले आहे. चक्क पोलिस पाटील यांनाच बेदम मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वाळू माफियाराज कधी थांबणार? हा सांगोला तालुक्यातील जनतेसमोर प्रश्न आहे.