ताजे अपडेट
Trending

गड्यानं कडलासात माल लावला, जवळ्यात नशा चढली, दुचाकींना ठोकरत रेटताना कंडक्टरने चावी काढून घेतली

थरारक घटनेचा ग्राउंड रिपोर्ट

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
गड्यानं सांगोल्यात एसटी ताब्यात घेतली.. सोबत माल घेतला होता… कडलासात माल लावला.. जवळ्यात नशा चढली, दुचाकींना ठोकरत रेटताना कंडक्टरने चावी काढून घेतली.. एक मोठा अनर्थ टळला..

सांगोला आगाराची दुपारी १२:३० वाजता सांगोला-जत जाणारी बस तब्बल दीड तास उशिराने सुटली. त्यात जवळा गावात पिऊन तर्र असलेल्या चालकाने जवळा गावातील चौकात उभ्या असलेल्या दोन दुचाकीला धडक दिली. मात्र बेभान होऊन गाडी चालविणाऱ्या या चालकाला प्रवाशांनी जवळा गावात मराठी शाळेसमोर रोखल्याने मोठा अनर्थ टाळला.

सध्या सांगोला आगार हे समस्यांचे आगार बनले असून प्रमुखाचे दुर्लक्ष, मीपणा यात वाढ होत आहे. यांच्यासह काही सहाय्यक दर्जाचे अधिकारी ही त्यात भर घालत आहेत. अशरक्ष: ग्रामीण भागातील शालेय मुल व अन्य प्रवाशी वर्गाना धोक्याचा प्रवास करावा लागत आहे. रविवार दुपारी सांगोला आगाराची सांगोला-जत ही तब्बल दीड तास उशिराने धावणाऱ्या गाडी क्रमांक एम एच ०६ एस ८०८४ च्या चालकाने चालू गाडीत कडलास गावा नजिक दारू ढोसून राडा केला. हीच घटना याच गाडीचा वाहक समाधान सुतार व गाडीतील प्रवाशी प्रा.भाऊसाहेब घुटूकडे यांनी सांगीतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, हीच गाडी जवळा गावात आली असता थांबा घेतला. त्यानंतर पुढे मार्गस्थ होत असताना थांबलेल्या दोन दुचाकी गाड्या आडव्या केला. एवढ्यावरच न थांबता गाडी कशीही चालवू लागला. दरम्यान जवळा गावातील मराठी शाळेसमोर हीच गाडी प्रवाशांनी रोखली अन् पुढे होणारी मोठी दुर्घटना टळली. यावेळी गाडीत ४६ प्रवाशी होते. कोणीतरी आगाराला याबाबत माहिती कळविली असता काही जणांची टीम अन् दुसरा चालक देवून ही गाडी पुढे जतसाठी मार्गस्थ केली.

आज सांगोला आगार हे अकार्यक्षम कारभारामुळे चर्चेत आले आहे. कोणतीच सुधारणा होताना दिसत नाही. अशा विनावेळापत्रकाच्या गाड्या सोडून अन् पिऊन गाड्या हाकणारे चालक यांच्यामुळे प्रवाशांच्या जीवना धोका ठरीत आहेत. जवळ्यातील ही घटना खूपच डेंजर होती. पण जागरूक प्रवाशामुळे धोका टळला. आज उपलब्ध असलेल्या गाड्यावर देखील योग्य नियोजन, गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने तालुकावासियानाही एसटीची सेवा चांगल्या प्रकारे मिळत नाही.

वाहकाने काही ते स्पष्ट सांगितले
सांगोला आगाराच्या जतला जाणाऱ्या या एसटीच्या चालकाबाबतची करामत स्पष्टच सांगितली. गाडी कडलास गावाच्या दरम्यान आली असताना, त्याने दारू पिली असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही बऱ्याच वेळा त्याच्या कुटुंबीयांकडे बघून याला समजावून सांगितले होते. पण काही केल्या सुधारणा दिसून आली नाही. जी घटना जवळा गावात घडली ही धोक्याचीच होती. गाडीत गर्दीही मोठ्या प्रमाणात होती.

तालुक्याला कोण आहे का वाली?
सांगोला तालुक्यात एसटीची सेवा तालुकावासियांना त्रासदायक ठरीत आहे. याबाबत अख्या तालुक्याला माहीत आहे. याबाबत अनेकजण आवाज उठवित आहेत. पण गेंड्याच्या कातडीचे असलेले प्रशासन काहीच सुधारणा करीत नाही. याचा सर्वाधिक त्रास शालेय मुलं-मुली, महिला, आजारी व्यक्ती व आबालवृद्ध यांना सोसावा लागतं आहे. यात असे हे प्रकार होत असताना कोणीच दखल घेत नसल्याने तालुक्याला कोण वाली आहे की नाही? असे मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहे.

कडलासपासून आदळ आपट
कडलास गावच्या पुढे आल्यानंतर या गाडीची आदळआपट सुरू झाली होती. त्यानंतर पुढे जवळा गावात थांबलेल्या दोन दुचाकीला आडवे केले. पण नंतर प्रवाशांनी हीच गाडी घेरडी रोडला असलेल्या जिल्हा परिषद शाळेसमोर रोखून धरली. त्यामुळे ४६ प्रवाशांचे प्राण वाचले. नाही तर डेंजर घटना घडली असती. आज सांगोला आगारातून बेटाईम गाड्या सोडून तालुक्यातील जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याचीच लोकप्रतिनिधीनी उचल बांगडी करावी. अन्यथा हे रोजचेच रडगाणे सुरू राहणार आहे. याची कोणीच दखलही घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सचिन गेजगे (घेरडी) यांनी व्यक्त केली .

यात्रेमुळे जवळ्यात गर्दी
जवळा येथील म्हसोबा देवाची यात्रा सुरू आहेत. त्यात सलग सुट्ट्या असल्याने या मार्गावर येणाऱ्या सर्वच रस्त्यांना गर्दी आहे. परवाच एका माजी प्राचार्यांचा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच जत गाडी जवळ्यात रोखली नसती तर मोठा धोका झाला असता. असे जवळा येथील अनेक प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

वाहकाने घेतली चावी काढून
सदर गाडीच्या चालकाने कडलास गावाच्या दरम्यान दारू ढोसली हे खरे आहे. गाडीत खूपच गर्दी होती. जवळ्यात दोन दुचाकीलाही धक्का दिला. त्यानंतर वेगानेच तेथून ही गाडी बाहेर घेतली. पण प्रवाशांनी वेळीच गाडी थांबविण्यासाठी गलका केला. त्यानंतर वाहक समाधान सुतार यांनी सदर एसटीची चावीच काढून घेतली. त्यामुळे धोका टळला असे वाहक स्वतः सांगत होते.

वाहन निरीक्षकाने गाडी कशी दिली?
सांगोला आगारातून जतला जाण्यासाठी येथील आगारातील वाहन निरीक्षकाने गाडी कशी दिली? त्याचवेळी तो चालक तोंड बांधून आला होता. मग गाडी ताब्यात घेतल्यावर, फलाटवर लावताना याने गाडी नोंदली का? त्याचे अनाऊंस झाले असेही डिकसळ येथील प्रवाशी पैलवान नानासाहेब इंगोले यांनी सांगितले. या घटनेची थरारक कहाणी यांनी सांगितली.

हेही पाहा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका