सांगोला/ नाना हालंगडे
“प्रवाशांच्या सेवेसाठी” असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सांगोला आगाराला आतापर्यंत एकही खमका अधिकारी मिळाला नसल्याने नवीन बसेस तालुक्याच्या नशिबात नाहीत. जुनाट, भंगार, स्क्रॅप असलेल्या बसेसवर या आगाराकडून “प्रवाशांची सेवा” सुरू आहे. हे चित्र कधी बदलणार, नव्या गाड्या कधी मिळणार?
सांगोला आगारात उपलब्ध असलेल्या पन्नास एसटी बसेसपैकी ४६ च्या आसपास गाड्या ह्या १३ ते १५ लाख किलोमिटर इतक्या धावल्या आहेत. आज केवळ आगारात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने याच गाड्या तालुक्यातील ग्रामीण भागात खोळंबा करीत आहेत. याबाबत एसटी प्रशासन उदासीन आहेच, मात्र तालुक्यात दोन माजी आमदार आणि एक आजी आमदार असतानाही प्रवाशांचे भोग सुरूच आहेत. हे तिन्ही आजी – माजी लोकप्रतिनिधी आलिशान महागड्या गाड्यातून फिरत असल्याने त्यांना प्रवाशांचे दुःख कसे समजणार? असाही प्रश्नच आहे.
सांगोला आगारात ग्रामीण भागात २८४ फेऱ्या तर लांब आणि मध्यम पल्ल्याच्या ४० फेऱ्या आहेत. साधारण २१ हजाराहून अधिक किलोमिटर एका दिवसात एसटी बसेस धावतात. मात्र, ग्रामीण भागावर अन्याय करून शहरी भागाला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ग्रामीण वेळापत्रक कोलमडत आहे.
त्यात सध्या शालेय सहलीचा हंगाम असल्याने रोज ५ ते ७ गाड्या जात आहेत. उर्वरित ४३ गाड्यांचे नियोजन करण्यात हेच प्रमुख अन्य कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना मेळ लागू देत नाहीत, असेही बोलले जाते.
ग्रामीण भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन लालपरी आहे. याच परीला सांगोला तालुक्यात हेकेखोर आगार प्रमुखामुळे खो बसत आहे. कोणतेच काम नियोजन करून केले जात नाही. केवळ किलोमिटर वाढवून ठेवून मी किती कर्तव्यदक्ष आहे हाच मीपणा रेटला जात आहे.
आगारात जुनाट आणि खराब झालेल्या गाड्या तालुक्यातील ग्रामीण भागातील मार्गावर धावत आहेत. पुण्यासाठी जाणाऱ्या गाड्यांची तर दयनीय अवस्था आहे. त्यांनाही प्रवाशी मिळत नाहीत. तर मुंबईसाठीही गाड्या पुरेशा नाहीत. एकेकाळी सांगोला आगार हे पुणे विभागात अव्वलस्थानी होते. त्यावेळी गाड्याही चांगल्या अवस्थेतील होत्या. वर्कशॉप विभागात गाड्यांची कामे चांगल्या पद्धतीने केली जात होती. आता आगाराला उतरती कळा लागली आहे.
विशेष म्हणजे सांगोला आगारात आज एकही मालवाहतूक गाडी नाही. ज्या काही खराब गाड्या आहेत त्यांचीही व्यवस्थित देखभाल दुरुस्ती केली जात नाही. हे सारे काम आगार प्रमुखांचे असते. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात याच गाड्या रोज खोळंबा करीत आहेत. असे हे विदारक चित्र असताना अधिकारी मात्र कुणालाच गिणत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?