
सांगोला / नाना हालंगडे
मनमानी कारभार करणाऱ्या आगार प्रमुखामुळे सांगोला आगार हे समस्यांचे आगार बनले आहे. सांगोला आगाराची लांब पल्ल्याची सांगोला-हैद्राबाद ही एसटी मोहोळ येथे पेटल्याने या आगाराच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगार प्रशासनाला कुणाची भीती आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
सांगोला आगारातून सांगोला-हैद्राबाद ही सकाळी ९:३० वाजता गाडी सुटते. हीच गाडी क्रमांक एम एच ११ बी एल ९४५१ ही गाडी पुढील बाजूने अचानक पेटली. यात ७३ प्रवाशी अन् दोघे चालक-वाहक असे ७५ जण होते. गाडीचा अर्धा भाग यात भस्मसात झाला. मोठे नुकसान यात झालेले आहे. आज आगारातून लांब पल्ल्याच्या १४ फेऱ्या तर अन्य अशा २७० फेऱ्या होत आहेत. पण कोणत्याच गाड्यांना याबाबत वेळापत्रक नाही. गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यापेक्षा अन्य कामात हा आगार प्रमुख असतो. अशा अनेक घटना याच आगारातील गाड्यांच्या होत आहेत.
रविवारी ही जी गाडी पेटली ती कशामुळे पेटली याचे काहीच कारण समजू शकले नाही. गाड्यांची व्यवस्थित देखभाल, दुरुस्ती केली जात नाही, हेच कारण पुढे येत आहे. या गाडीला स्विच होता का? गाडीत अग्निशामकचा पंप होता का? याची उत्तरे मिळत नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांची अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागात चालणाऱ्या गाड्यांचा विचार न केलेलाच बरा. ग्रामीण भागात तर आगार प्रशासनाचे लक्षच नसते.
रविवार सायंकाळी मुक्कामी जाणाऱ्या अनेक गाड्यांना वेळापत्रकच नव्हते. सायंकाळी ५:३० वाजता सांगोला आगारातून सांगोला-जत ही घेरडीमार्गे जाणारी मुक्कामी गाडी दोन तास उशिराने गेली. याबाबत येथील नियमित प्रवाशी उत्तम गेंड म्हणाले, हे सारे अकार्यक्षम असलेल्या आगारप्रमुखामुळेच होत आहे. याने एकदा याच आमच्या मार्गावर प्रवास करून बघावे. ही ग्रामीण भागातील रोजचीच ओरड आहे.
आज सांगोला आगार हे समस्यांचे आगार बनले आहे. कोणीच लक्ष देत नाहीत. त्यामुळे यात वाढच होत आहे. हाच प्रमुख स्वतःची जहागीरदारी समजत आहे. ही घटना खूपच निंदनीय आहे. आज गाडी पेटल्याने अंदाजे ८ लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. त्यातच आगारात गाड्या कमी आहेत. गाड्या व्यवस्थित दुरुस्त केल्या जात नसल्याने प्रवाशांना सेवा मिळत नाही.
सांगोला आगाराला प्रमुख असलेल्या आगार प्रमुखाला आपल्या अधिकार, कर्तव्याची जाण आहे का? आज एकाही गाडीला वेळापत्रक नाही. रविवारी साडे पाचची जत गाडी साडेसात वाजता सोडली. त्यात हैद्राबाद गाडी पेटली. हे प्रमुख काय करतायेत? याबाबत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून अशा अधिकाऱ्याला घराचा रस्ता दाखवावा, अशी मागणी एसटी प्रवाशी उत्तम गेंड यांनी केली आहे.