सांगोला/नाना हालंगडे
सागोला आगार हे समस्याचे आगार झाले असून गुरूवार 9 जानेवारी रोज सकाळी 7.40 मिनिटांनी नराळे-सांगोला बस क्र. एम.एच. 14 बीटी 2839 या गाडीचा कडलास गावात ब्रेक फेल झाला. रस्त्यावर खड्डे असल्याने बसची गती कमी होती. त्यामुळे एक मोठा अपघात होता होता वाचला. या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
सांगोला तालुक्यातील एसटी आगार अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे बदनाम होताना दिसत आहे. तालुक्यात आगार व्यवस्थापनावर कुणाचा वचक आहे की नाही अशी स्थिती आहे.
गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात एसटीची सेवा ही अवसानघातकी ठरत आहे. ग्रामीण भागातच या एसटीच्या पावणे तीनशेच्या आसपास फेऱ्या आहेत. पण आगारप्रमुखच अकार्यक्षम असल्यामुळे जनतेला चांगली सेवा मिळत नाही.
गुरूवारी सकाळी नराळेहून सकाळी 6.15 वाजता नराळे – सांगोला ही बस नराळेहून सांगोल्याकडे येत होती. या एसटी बसमध्ये नराळे, हबिसेवाडी, डिकसळ, पारे, मानेवारी, पारे तलाव, घेरडी, तरंगेवाडी, वाकी फाटा, जवळा, देशमुखवस्ती, पाटीलवस्ती व कडलास आदी गावातून चढउतार करून 70 शालेय मुले व प्रवासी सांगोल्याकडे येत असताना या गाडीचा ब्रेक फेल झाला. सदरची घटना सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी घडली. घटना घडली ठिकाण ते सांगोला हे अंतर अवघे 7 किमी असताना वर्कशॉपमधील टीम येथे 10 वाजता पोहोचली. सकाळी 11.45 वाजले तरी ही बस कडलास गावानजीक असलेल्या अभिनव हॉटेलसमोर आहे त्या अवस्थेत उभी होती.
सध्या 11 वी 12 वी च्या मुलांचे आज 9 जानेवारीपासून पेपर सुरू झाले आहेत. या पेपरची वेळ सकाळी 8 ची हेाती. त्यामुळे असंख्य मुलांना पहिल्या पेपरसाठी अर्धा ते पाऊण तास उशीर झाला. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
थांब्यावरून गेली अन् ब्रेक फेल झाला
सदर एसटी कडलास गावातील थांबा घेवून सांगोल्याकडे मार्गस्थ होत असताना ही घटना घडली. गाडीचा वेग खूप कमी होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याच ब्रेक होण्यापूर्वी डिझेल पाइप फुटली. सदरचा भाग हा सपाट व खड्ड्याचा असल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत 60 फुटावरती ही गाडी थांबवली आणि एसटीत असलेल्या 70 शालेय मुले व प्रवासी यांचा जीव वाचला.
दरम्यान सलग भाग, खड्डे अन् स्पीड ब्रेकर असल्यामुळे धोका टळला आहे. आज केवळ वर्कशॉपमध्ये गाड्यांची योग्य पद्धतीने देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने अशा या घटना घडत आहेत. याला आगारप्रमुखच जबाबदार आहे. याबाबत नेतेमंडळी लक्ष देत नसल्याने, यात वाढच होत आहे.
सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?
जवळा येथे पिकअप – दुचाकीचा भीषण अपघात, माजी प्राचार्यांचा जागीच मृत्यू