सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?
पंचनामा सांगोला आगाराचा
सांगोला / नाना हालंगडे
“प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्याचा सांगोला बस आगाराला विसर पडला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, असे या आगाराला वाटतच नाही. त्यांच्या सुरक्षिततेचे यांना काहीही पडलेले नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे या आगारातील बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळेच सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की
प्रवाशांना मारण्यासाठी? असे उद्विग्नपणे म्हणावे लागत आहे.
अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त आणि जुनाट
सांगोला आगारातील सांगोला ते हैद्राबाद ही बस मागील दोन दिवसांपूर्वी मोहोळ आगारात पेटली. या बसमध्ये अग्निशमन सिलिंडर होता. मात्र आग विझवण्यासाठी तो सुरू केला खरा; मात्र त्यातून धुरच बाहेर आला नाही. हा अग्निशमन सिलिंडर एक्सपायरी डेट संपलेला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सांगोला आगारात काही बसेसमध्ये जे अग्निशमन पंप आहेत त्यातील बहुतांशी एक्सपायरी डेट संपलेले आहेत. अनेक बसेसमध्ये अग्निशमन पंपच नसल्याचे धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
गाड्यांमध्ये अग्निशामक यंत्राची सुविधा नाही. प्रथमोपचार पेट्याही गायब आहेत. त्यामुळे अचानक काही धोका उद्भवला तर प्रवाशी जनतेने काय करायचे?
थिंक टँककडून पर्दाफाश
त्याच अनुषंगाने “थिंक टँक” टीमने सांगोला आगारातील काही बसची पाहणी केली असता सांगोला आगारातील अनेक गाड्यांना ही सुविधाच नसल्याचे आढळून आले. बुधवार ८ जानेवारी २०२५ रोजी सांगोला आगारातून पुण्यासाठी दुपारी २ वाजता एक गाडी मार्गस्थ झाली. त्या गाडीतही हा अग्निशमन सिलिंडर नव्हता. त्या गाडीचा क्रमांक एम एच ४० एन ९०७१ असा होता. याचवरून आगारप्रमुख प्रवाशांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे.
सांगोला आगारात जणू अनागोंदी माजली आहे. एसटी बसेस पेटत आहेत. मार्गावर बंद पडत आहेत. पण यांना याबाबत काहीच देणेघेणे नाही. यापूर्वी आगारात ५१ एसटी बसेस होत्या. परवा हैद्राबाद गाडी पेटल्याने मोठे नुकसान झाले. सद्या आगारातून दिवसभरातून पुण्यासाठी ५ गाड्या, मुंबई, पणजी, कोल्हापूर व हैद्राबाद अशा एक एक गाड्या धावत आहे. यांना तर सोडाच तालुक्यातील ग्रामीण भागात धावणाऱ्या २८७ एसटीच्या फेऱ्याही अग्निशामक पंपविना धावत आहेत. सांगोला तालुक्यात एसटीची सेवा बेभरवशाची झाली आहे, असेच म्हणावे लागेल.
पुण्या-मुंबईलाही नाही अग्निशामक पंप
सांगोला आगारातून पुण्यासाठी दिवसभरातून ५ गाड्या तर मुंबई, पणजी, हैद्राबाद, सातारा, सोलापूर व कोल्हापूरसाठी काही गाड्या धावतात. याच गाड्यांमध्ये अग्निशामक यंत्राची सुविधा नाही. प्रथमोपचार पेट्याही गायब आहेत. त्यामुळे अचानक काही धोका उद्भवला तर प्रवाशी जनतेने काय करायचे. याबाबत प्रमुखाने लक्ष देवून यात सुधारणा करणे गरजेचे आहे. मात्र, प्रमुखाचे लक्ष नेमके कशात आहे? हे समजायला मार्ग नाही.
प्रवाशांचा जीव मुठीत
आज तालुक्यातील जनतेला एसटीच्या गैरसोयीबाबत अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये शालेय मुले, महिलावर्ग तसेच अबालवृद्ध यांना रोजचाच त्रास सोसावा लागत आहे. आज ग्रामीण भागातील एकही गाडी वेळेवर सोडली जात नाही. नियंत्रण कक्षातून योग्य माहिती दिली जात नाही. हा सारा प्रकार केवळ आगार प्रमुखामुळे होत आहे. हा प्रकार कधी थांबणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.