सांगोला कारखान्याची गोड साखर झाली कडू
सर्वपक्षीय नेत्यांचे हात बरबटले, कोण रोखणार अधोगती?
सांगोला : डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याची गोड असणारी साखर कडू झाली आहे. यात सर्वपक्षीय नेत्यांचे हात बरबटले आहेत.
सहकार चळवळीच्या माध्यमातून साखर कारखाने उभे करून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना उद्योग तसेच बेरोजगारांच्या हाताला काम मिळून आर्थिक जीवनमान सुधारावे या उद्देशाने जिल्ह्यात साखर कारखाना रुपी सहकार मंदिरे उभारली गेली. ते राजकारणासाठी उध्वस्त करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याची उद्योग होऊ नये असे मत तालुक्यातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात गावोगावी दूध संस्थांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक उन्नती झाली. साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या भागाचा कायापालट झाला. दुष्काळी तालुक्याचे परिवर्तन झाले. सांगोला सहकारी साखर कारखाना उभा राहत असताना तो कारखाना एका पक्षाचा किंवा एका कोणत्या नेत्यांनी उभा केला नाही. तर तालुक्यातील सर्वच पक्षांचे नेतेसह कार्यकर्त्यांनी उभा केलेला कारखाना आहे. दर चार वर्षातून एकदा सांगोला तालुक्यात दुष्काळ पाचवीला पूजला आहे. त्यामुळे उसाअभावी कारखाना अकरा वर्ष बंद होता. कारखान्यावर बँकांचे कर्ज होते व त्याच्या व्याजाने बोजा वाढला त्या कारखान्याच्या संचालक मंडळात शेकापचे 11 व इतर सर्व पक्षाचे दहा संचालकांचा समावेश होता.
दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नेतृत्व लाभलेला, तसेच माजी आमदार शहाजी पाटील हे कारखान्याचे प्रथम चेअरमन असताना साखर कारखान्याचे कार्यालय उभा राहिले. त्यावेळीही इमारतीतील पाटील यांनी पैसे खाल्ले असे मोघम आरोप होत होते. त्यानंतर माजी आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी साखर कारखाना उभा करून सुरू केला व तो काही काळ चालू होता. ऊसा अभावी साखर कारखाना अकरा वर्षे बंद होता. त्यावेळीही कारखान्याचे चेअरमन माजी आम.दीपकआबा साळुंखे-पाटील तसेच संचालक मंडळांनी कारखान्यातील सामानाची विक्री केली असे अनेक आरोप झाले. परंतु ज्यावेळी कारखाना चालवण्यासाठी आ.अभिजीत पाटील यांना दिला त्यांनी एक महिन्यात तो कारखाना सुरू केला. सुरू करते प्रसंगी विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख माजी आम.शहाजी पाटील आणि माजी आम. व चेअरमन दीपक साळुंखे पाटील यांच्या उपस्थित आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, कारखान्याचा एक नट बोल्टही विक्री झाला नाही. जर मशिनरी विकली असती तर कारखाना एका महिन्यात सुरू झाला नसता.
सदर कारखान्यास दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नेतृत्व लाभले होते. त्यांची सर्व सहकारी संस्थावर करडी नजर असे, भ्रष्टाचार कधी त्यांना शिवला गेला नाही. तसेच या साखर कारखान्यावर दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व पदस्पर्शाने पावन असलेल्या साखर कारखान्याने साखर परस्पर विक्री केली म्हणून,पंधरा वर्षांनी गुन्हा दाखल होतो. याची चर्चा तालुक्यात सध्या जोरात चालू आहे. त्या काळात कारखान्याचे लेखापरीक्षण झाले नाही का? इतके दिवस सहकार खाते व महाराष्ट्र शासन झोपले होते का? असे अनेक प्रश्न नागरिकात चर्चिले जात आहेत.
महाराष्ट्र शासनाने राजकीय सूडबुद्धीने सहकार मंदिरे व सहकार चळवळीसाठी त्याग करणाऱ्या नेते, कार्यकर्त्याचे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचे उद्योग खेळणे योग्य नाही. जनता सुज्ञ आहे. 1975 ची आणीबाणी कालावधी जनतेला माहित आहे व सध्याच्या नेतृत्वालाही माहित आहे. आज त्यांची काय परिस्थिती आहे. तीच परिस्थिती सत्तेवर असलेल्यांना येऊ नये असे वाटत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
भ्रष्टाचाराचे कोणी समर्थन करत नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्याला शासन झालंच पाहिजे परंतु आज जे सत्तेत असणारे मंत्री, नेते तसेच अधिकारी व सत्तेच्या बाहेर असणारे सर्व पक्षांचे नेत्यांची सुद्धा ज्यावेळी ते राजकारणात आले त्यावेळची त्यांची आर्थिक परिस्थिती व आज सर्वांची आर्थिक परिस्थिती पहा. यावरून कुणी धुतलेल्या तांदळासारखे नाही असे दिसून येते. त्यासाठी काहीतरी उपाय करा व भ्रष्टाचार थांबवा परंतु सूडबुद्धीने सहकार मंदिरे उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिकातून होत आहे.
सांगोला साखर कारखानाच्या संचालक मंडळात एकाच पक्षाचे संचालक नसून त्यामध्ये शेकाप, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचे नेतेमंडळी आहेत. हा कारखाना तालुक्यातील कष्टकरी शेतकरी जनतेने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या विकून शेअर्स घेतलेल्या सभासदांचा आहे. त्यामुळे कारखान्याविषयी तालुक्यातील जनतेला आपुलकी आहे.
- १५ वर्षानंतर सहकार विभागाला येते जाग
- ११ सदस्य शेकापचे
- स्व.गणपत आबांनीच कारखान्याची मुहूर्तमेड रोवली.
- लोकप्रतिनिधी असलेल्या आबांच्या नातूनी सहकाराकडे द्यावे लक्ष.
- कारखान्याच्या साखर विक्रीच्या गुन्ह्यात सर्वपक्षिय नेत्यांचा समावेश.
- सांगोला तालुक्याची बदनामी कोण थांबविणार?