
स्पेशल रिपोर्ट / नाना हालंगडे
सांगोला तालुक्याला विविध योजनांचे पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निवेदनांचा पान्हा फुटला आहे. निवेदने देवून “पाण्यासाठी मी कसा प्रयत्न करतोय” हे मतदारांना दाखवण्यासाठी सर्वांचा आटापिटा सुरुय. नेत्यांच्या निवेदनबाजीमुळे मात्र शेतकऱ्यांची चांगलीच करमणूक होत आहे. शेतकरी नागरिक हे बोळ्याने दूध पितात असे, राज्यकर्ते समजत असेल तर ते चुकीचे असून एक वेळा फसवता येते वारंवार फसविता येत नाही. हे नेत्यांनी लक्षात घ्यावे, असाही सूर उमटत आहे.
तालुक्यात अनेक विकासाची कामे आहेत ते आणण्यासाठी या तीन प्रबळ नेत्यांनी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री यांचे बरोबर वरील तिन्ही नेत्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडून महूद, हातीद येथे नवीन पोलीस ठाणे साठी प्रयत्न करावा व त्यामुळे त्या परिसरात शांतता सुव्यवस्था नांदेल व अवैध धंद्याला आळा बसेल.
दिवंगत आम.गणपतराव देशमुख यांचा 55 वर्ष अभ्यासू आमदार म्हणून देशात नावलौकिक होता. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या टेंभू ,म्हैसाळ, निरा उजवा कालवा, राजेवाडी तलाव, उजनी, या योजनेचे टेलला सांगोला तालुका आहे.पाणी वाटपानुसार आवर्तन जे होते त्या तारखेला या योजनेचे पाणी सुटत होते. तेवढा दबदबा महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, हेडपासून टेलपर्यंत असणारे आमदार, व अधिकाऱ्यावर दिवंगत आम. गणपतराव देशमुख यांचा आदर युक्त वचक होता.त्यांना कधीही पालकमंत्री,मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री अथवा टेलकडील आमदारांना पाणी सोडण्यासाठी विनंती करावी लागली नव्हती. क्रांतिवीर नागनाथ नाईकवडी तसेच गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी १३ तालुक्यांची ३० वर्ष ३० पाणी परिषदा झाल्या आणि त्या पाणी परिषदेमध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख व त्यांचे निष्ठावंत सहकारी जगन्नाथ लिगाडे,रामभाऊ वाघमोडे, जगन्नाथ कोळेकर,वसंतराव पाटील यांनी त्यावेळी शासनाला ठणकावून सांगत असे “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” असे पाणी परिषद मधील घोषवाक्य बनले होते व ते ठणकावून सांगणारे गणपतराव देशमुख तसेच 2024 पर्यंत माजी आमदार शहाजी पाटील हे होते व त्यांचा काळ होता.
आताचे विद्यमान आमदारांना मुख्यमंत्र्याला विनंती करावी लागते.आम्हाला पाणी सोडा, एवढेच काय पालकमंत्री व शेजारचे तालुक्याचे आमदार यांना विनंती करण्याची वेळ विद्यमान आमदार व माजी आमदार शहाजी पाटील यांच्यावर येते.म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यांचे”नाक दाबा, तोंड आपोआप उघडते”या तत्त्वाचे राजकारण सुरू आहे का ? अशी चर्चा चालू आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासारखा दबदबा निर्माण होणे गरजेचे आहे.जे पाणी तालुक्याला मिळते ते तालुक्यातील शेतकऱ्यांनी, जनतेने संघर्षाने मिळविलेले आहे.
या संघर्षात जेवढे गणपतराव देशमुख यांचा त्याग आहे. थोडाफार माजी आमदार शहाजी पाटील यांचाही आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी आले आहे. देशमुख व पाटील यांच्या त्यागातून, संघर्षातून, शेतकऱ्यांच्या मोर्चे,आंदोलनातून ते मिळालेले आहे.ते काय सहजासहजी मिळालेले नाही व ते अडवण्याचा अधिकार पालकमंत्री अथवा माजी खासदाराला नाही हे आजी व माजी आमदारांनी ठणकावून सांगण्याची गरज आहे.आम्हाला पाणी देता का? अशी मागणीची वेळ येते हे सांगोलकर यांच्या दृष्टीने दुर्दैवाचे आहे.आपण हक्काचे पाणी मागतो.ते ब्रिटिशांनी व महाराष्ट्र शासनाने पाणी वाटपात सांगोल तालुक्याला दिले आहे ते भीक नाही. कोणत्याही राज्यकर्त्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना पाण्याच्या नावाने राजकारण केल्यास सत्ता मिळेल असे वाटत असेल तर ते चुकीचे असून त्या दृष्टीने गृहीत धरणे योग्य वाटत नाही.
तालुक्यात गेली आठ दिवस माजी आमदार शहाजी पाटील विद्यमान आम.डॉ.बाबासाहेब देशमुख व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार_सावंत हे मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री पालकमंत्री यांना पत्र देत आहेत. दोन दिवसात चार दिवसात पाणी सोडतो असे सांगितल्याची पत्रकबाजी जोरात सुरू असून त्यावर शेतकरी व नागरिकांची चर्चा होत असून सांगोल्याची जनता एवढी भोळी आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
तालुक्यात अनेक विकासाची कामे आहेत ते आणण्यासाठी या तीन प्रबळ नेत्यांनी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री यांचे बरोबर वरील तिन्ही नेत्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडून महूद, हातीद येथे नवीन पोलीस ठाणे साठी प्रयत्न करावा व त्यामुळे त्या परिसरात शांतता सुव्यवस्था नांदेल व अवैध धंद्याला आळा बसेल. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावा. उपमहसूल म्हणजेच प्रांत कार्यालय यासाठी, तसेच शहरातील विकासाची अनेक प्रलंबित कामे आहेत ते सोडविणे गरजेचे आहे.
तालुक्यातील कोळा,जवळा, महूद या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करता येते का? त्यासाठी नगर विकासमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध असल्याने नगरपंचायतसाठी प्रयत्न व्हावा. सध्या ज्या ठिकाणी बस स्थानक आहे तेथेच नवीन बस स्थानक व व्यापारी संकुल बांधून बेरोजगारांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे, औद्योगिक वसाहत, नवनवीन उद्योगधंदे, डाळिंबावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे तसेच सांगोला साखर कारखान्याचे 20 हजार सभासद आहेत त्यांना दिपावाळीला किमान कमीत कमी दरात साखर मिळवून देणे, आधी विकास कामे आणून त्याची पत्रकबाजी व्हावी अशी शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व नागरिकांची अपेक्षा असून, त्याबाबत प्रयत्न व्हावा.
योगायोगाने सत्तेतील दोन पक्षाचे प्रबळ नेते तालुक्यात आहे. तसेच विद्यमान आमदार यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत त्याचा उपयोग तालुक्यातील विकासासाठी व्हावा. मात्र, तसे होताना दिसत नाही? राजकारण हे निवडणुकी प्रसंगी सर्वांनीच करावे परंतु इतर वेळा सर्वच पक्षांनी एकत्र येऊन तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावा यापैकी कोणालातरी जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.याचे हेच फळ आगामी सर्वच निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. ही जनता काय दूधखुळी नाही. याचा सर्वात मोठा फटका सर्वपक्षीय नेत्यांनी बसणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे.