सांगोल्यातील “त्या” अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

सांगोला : सांगोला पोलीस स्टेशन येथे नव्याने घेण्यात आलेल्या बोअरला पाणी लागले म्हणून धार्मिक कर्मकांड करण्यात आले असून ही घटना संविधान विरोधी असल्याचा आरोप करत हे कृत्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी विविध पुरोगामी विचारांच्या संघटनांनी तहसीलदारांकडे केली आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समिती, संभाजी ब्रिगेड, बहुजन क्रांती मोर्चा, अखिल भारतीय मसणजोगी महासंघ, जनआरोग्य अभियान आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी याबाबतचे निवेदन तहसीलदार संजय खडतरे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सांगोला पोलीस ठाण्यामध्ये बोअरला पाणी लागले म्हणून धार्मिक कर्मकांड करण्यात आले आहे. जेवणावळी घालण्यात आली आहे. हे कृत्य संविधान विरोधी आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात विशिष्ठ धर्माचे उत्सव साजरे करता येत नाहीत. या नियमाला हरताळ फासण्याचे काम पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम २५, १ (१) आणि कलम २८ (३) नुसार हे कृत्य संविधान विरोधी आहे. म्हणून या घटनेची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रभाकर माळी (अंधश्रद्धा निर्मुलन समिती), बापूसाहेब ठोकळे (बहुजन क्रांती मोर्चा), प्रदीप मिसाळ (संभाजी ब्रिगेड), विनायक शिंदे (संभाजी ब्रिगेड), अनिल शिंदे (संभाजी ब्रिगेड), गणेश महांकाळ (संभाजी ब्रिगेड), राजू मगर (संभाजी ब्रिगेड), लक्ष्मण घनसरवाड (अखिल भारतीय मसणजोगी महासंघ), शहाजी गडहिरे (जनआरोग्य अभियान), प्रवीण सूर्यगंध (जनआरोग्य अभियान), इरफानभाई फारुखी (बहुजन क्रांती मोर्चा), शौकत खतीब (एमआयएम) यांच्या सह्या आहेत.
