
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडी येथील बुरंगले वस्तीवर दोघी सासू-सूनेवर वनप्राण्याने गंभीर हल्ला केला असून यात सासू हिराबाई शिवाजी बुरुंगले (वय ५५) ह्या गंभीर जखमी झाल्या आहे. तर सुनबाई सारिका तानाजी बुरुंगले (वय ३२) ह्याही यात जखमी झाल्या आहेत. या दोन्हीही महिला सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हिराबाई यांची प्रकृती गंभीर आहे. एवढी मोठी घटना घडूनही सुस्तावलेले प्रशासन बेफिकीर असून एरव्ही नको त्या गोष्टीचे राजकारण करण्यात धन्यता मानणाऱ्या नेतेमंडळींनीही या घटनेकडे पाठ फिरविली आहे. तालुक्यातील जनतेला कोणी वाली आहे की नाही ? असा प्रश्न या भागातील ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे.
सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट असून, वन्य प्राणीही मोठ्या संख्येने आहेत. आज केवळ याच फॉरेस्टचे पाणवठे कोरडे असल्याने हे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत. ही घेरडीची घटना यातूनच घडली आहे. लांडगा की तरस? याबाबत माहिती मिळत नाही. येथील दोघी सासू-सून स्वतःच्या शेतात काम करीत असताना ही घटना घडली आहे.
उपचारास टाळाटाळ!
प्रारंभी या दोघी जखमी महिलांना उपचारासाठी दवाखान्यात कोणीही दाखल करून घेत नव्हते. सांगोला येथील एका खाजगी दवाखान्यात या दोन्ही महिला उपचार घेत आहेत. या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांना विचारले असता “नेमका हल्ला कशाने केला माहीत नाही? आमच्या वनपाल वाघमोडे यांनी पंचनामा केला आहे. चौकशी करून सांगतो” असे ते म्हणाले. त्यांनी याबाबत काहीच माहिती दिली नाही.
वनरक्षक मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता मलाही याबाबत कल्पना नाही. मात्र एक महिला गंभीर आहे, एवढेच ते बोलले.
आज सांगोला तालुक्यात फॉरेस्ट मोठ्या प्रमाणात विस्तारले असतानाही वन विभागातील कोणीच म्हणावे तसे काम करताना पहावयास मिळत नाही. त्यात कंत्राटी वनमजूर तर फॉरेस्टचे दादाच झाले आहेत. वनरक्षक नेमलेल्या विभागात दिसत नाहीत. त्यामुळे फॉरेस्टची वाट लागलेली आहे.
आज घेरडी येथील गरीब कुटुंबातील दोन्ही सासू-सून हकनाक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या. त्यातील एकीची प्रकृती गंभीर आहे. यातून त्या बऱ्याही होतील पण असे हल्ले होत राहिले तर जनतेने मुक्त कसे वावरायचे? हा सवाल आहे.
या हल्ल्यात हिराबाई बुरुंगले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तोंडावर, हातावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. सध्या त्या सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत वनरक्षक मुंडे यांनी स्वतःच सांगितले.
लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी
तालुक्यात घडलेली ही गंभीर घटना आहे. स्वतः नूतन लोकप्रतिनिधी या घेरडी गावात काल रात्री आले होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना या घटनेबाबत अवगत करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. आज हेच लोकप्रतिनिधी विजयी मताइतकीच झाडे लावण्यास निघाले आहेत. पण तालुक्यात फॉरेस्ट विभाग किती कर्तव्यदक्ष आहे, हे ही पाहणे गरजेचे आहे.
कोण राखतय फॉरेस्ट?
सांगोला तालुक्यात फॉरेस्ट लयास लावण्यास फॉरेस्ट विभागाचं कारणीभूत आहे. यांच्यात कंत्राटी वन मजुरांचा भरणा आहे. नराळेचे फॉरेस्ट उद्धवस्त झाले आहे. असे प्रकार तालुक्यात सवर्त्रच पहावयास मिळत आहेत. वनपाल,वनरक्षक आपल्या नेमलेल्या भागात दिसत नाहीत. त्यातच वन्यप्राण्यांचा मानव वस्तीतील वावर जीवावर उठत आहे.
अधिकारी म्हणतात मीटिंग आहे
ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी येथील एका इसमाने फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन केला. आपण घटनास्थळी येवून पाहणी करावी. हल्ला केलेला प्राणी कोणता आहे याचा तपास करावा, लोकांना धीर द्यावा अशी विनंती केली. मात्र, त्यांनी मला सोलापूरला मीटिंग आहे असेच काहीसे कारण सांगितले. त्यानंतर वनपाल वाघमोडे यांनी यांनी पंचनामा केला. मात्र प्राणी नेमका कोणता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.