घेरडीतील सासू-सूनेवरील हल्ला लांडग्याचाच
वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवरांनी दिली दवाखान्यात भेट

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडी येथील सासू-सुनेवर जो वन्यप्राण्याने हल्ला केला होता, तो लांडग्यांनी केला होता, असा खुलासा वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी तब्बल तीन दिवसांनी केला आहे. ते “थिंक टँक”शी बोलत होते.
“थिंक टँक”वर काल ही बातमी प्रसिद्ध होताच तालुक्यात खळबळ उडाली होती. एवढी मोठी घटना घडूनही कोणीही याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. वनविभागही बेफिकीर होता. वास्तविक पाहता त्यांनी या घटनेची तात्काळ माहिती घेऊन खुलासा करणे अपेक्षित होते. माध्यमांना खरी माहिती देणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही.
“थिंक टँक”वर बातमी प्रसिद्ध होताच वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगोला येथील साळुंखे हॉस्पिटल येथे जावून जखमी हिराबाई बुरुंगले व सारिका बुरुंगले यांची चौकशी केली. त्यांना दोन वन्य प्राण्यांचे फोटो दाखवले. त्यापैकी त्यांनी हल्ला केलेला लांडगा प्राणी ओळखला. त्यामुळे लांडग्यानेच हल्ला केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर म्हणाले की, घेरडी येथे सदरच्या महिला त्यांच्या शेतात ज्वारीमध्ये गवत काढत असताना ही घटना दुपारी साडेतीन वाजता घडली होती. मला फोनवर विचारले असता सांगोला येथे सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर तिथून त्यांना सोलापूरला उपचारासाठी पाठवले. सोलापूर येथे सरकारी दवाखान्यात उपचार केले. जखमेवर टाके घेणे लगेच शक्य नसल्याने त्यांनी ११ डिसेंबर रोजी सोलापूरला सरकारी दवाखान्यात डॉक्टरने बोलावले होते. परंतु हिराबाई बुरुंगले ह्या सोलापूर येथे गेल्या नाहीत. त्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या सुनबाई सारिका बुरुंगले यांना बोटाला जखम आहे. गुडघ्याला जखम आहे.
तसेच हिराबाई यांना गालाला जखम आहे. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात साळुंखे हॉस्पिटल सांगोला येथे टाके घेतले आहेत. दवाखान्यातील खर्च ऑफिसला कागदपत्रे दाखल केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर करून सदरची रक्कम पेशंट यांच्या खात्यामध्ये आरटीजीएस केली जाईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले.