
चर्चा तर होणारच/ नाना हालंगडे
“काय झाडी, काय डोंगार… काय हाटील.. समद कसं एकदम ओके हाय…” हा डायलॉग तमाम महाराष्ट्राने ऐकला आहे. सांगोला मतदार संघात मात्र या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याने तुल्यबळ उमेदवारांचा जंगी सामना होणार आहे. मतदार राजा कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.
सेनेचेच दोन उमेदवार अन् शेकाप हे तिघेजण निवडणुकीस समोरासमोर ठाकल्याने तिरंगी लढत आता तालुक्यात होणार आहे. अनेकांनी पक्ष बदलले, झेंडे बदलेले, निष्ठा बदलली पण तालुक्यातील जनतेचे काय? याचा मात्र कोणीच विचार करीत नाही.
उद्या सोमवार २८ ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील हे तीनही उमेदवार आपली नामनिर्देशन पत्रे भरणार असून यांच्या सांगोल्यात सभा होत आहेत. या नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी ही उबाठा गटाच्या उमेदवाराने आजपासून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. काही असो तालुक्यात या सर्वांचेच खमके राजकारण सुरू आहे.
सांगोला तालुक्यातील राजकारण आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. अदला बदली कशी करायची हे नेत्यांना माहीत पण मतदार राजाही त्यांच्या पुढील चालीचा आहे.
असो….. *कुणी झेंडे बदलले आहेत.कुणी दांडे बदलले आहेत. कुणी बदलला झुली, कुणी गोंडे बदलले आहेत. कुणी मालक बदलला आहे. कुणी पालक बदलला आहे. जो चालेल तो चालण्यासाठी, कुणी चालक बदलला आहे. जिकडे बघावे तिकडे, सगळी अदलाबदली आहे. विधानसभेच्या निमित्ताने ज्याने त्याने संधी साधली आहे.*
उद्या ताकदीचा सामना
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील काही पुढाऱ्यांनी माल वाटण्यास सुरुवात केली आहे. उद्या सोमवारी आपला अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या मागे किती जनता आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी गर्दी जमवण्यासाठी शेकडो चार चाकी गाड्या, सहा चाकी गाड्या बुक केल्या असल्याची समजते. लेकरा बाळांसमवेत सांगोल्याला या हा आदेश अनेकांनी दिला आहे. काही नेत्यांनी रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांना उद्या रोजगारासाठी जाऊ नका तुमचा रोजगार मी देतो असे सांगून तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही कारण न देता गाडीत बसून यावे असे फर्मान काढले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने तीनही नेते उद्या सांगोल्यात आपली गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाबडी जनता मात्र कोणाच्या मागे जायचे? पैसेवाल्याच्या की अन्य कोणाच्या या संभ्रमात आहे.