सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला आगारातील अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता प्रवाशांच्या जीवावर उठली आहे. सकाळी कडलासजवळ ब्रेक फेल झालेली बस पुन्हा प्रवाशांना कोंबून नराळे गावाला निघाली होती. पारे तलावाजवळ ही गाडी आली असता गाडीचा हवेचा पाईप फुटला आणि पुन्हा ब्रेक फेल झाला. बस चालकाने मोठ्या हिमतीने गाडीवर नियंत्रण मिळविले. दिवसभरात दुसऱ्यांदा मोठा अपघात होता होता वाचला. एखादी मोठी दुर्घटना झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार नाहीत, असेच यावरून दिसते.
आज गुरुवारी सकाळी हवेची पाईप तुटून ब्रेक फेलची घटना ज्या २८३९ क्रमांकाच्या गाडीने केली होती, त्याच गाडीची सायंकाळी सव्वापाच दरम्यान अशीच घटना घडल्याने या मार्गावरील शालेय मुल अन् प्रवाशी वर्गाना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याचवेळी गाडीत चाळीसच्या वरती प्रवाशी अन् शालेय मुल होती. एसटी बसचा ब्रेक सारखाच फेल होत असेल तर तालुक्यातील जनतेनी काय करायचे हा सवाल उपस्थित होत आहे.
सांगोला आगाराची घेरडी, पारे, डिकसळ ते जत मार्गावर बेभरवशाची एसटी सेवा सुरू आहे. सकाळी याच गाडीचा अपघात होता होता वाचला. याची चित्तथरारक कहाणी या चालकाने सांगितली. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी थांबविली. नंतर तीन तासाने वर्कशॉप विभागातील टीमने तात्पुरती दुरुस्त करून आगारात गाडी नेली. त्याचवेळी चालकाने रिमार्कही मारला होता. मग या गाडीची काय दुरुस्ती केली? याच गाडीची परिस्थिती या प्रमुखाने पहिली होती का? पुन्हा याच मार्गावर पुन्हा या गाडीने खोळंबा केला. मोठा अपघात झाला असता तर काय झाले असते?
गुरुवार सायंकाळी ४ वाजता सांगोला आगारातून नराळे गावांसाठी जादा गाडी गेली कित्येक दिवसापासून सुरू आहे. सकाळी खोळंबा झालेली गाडीच पुन्हा नराळे गावाला जात असताना सकाळ सारखीच घटना घडली. याच एसटीमध्ये पारे, डिकसळ, हबिसेवाडीसह शेजारच्या गावातील शालेय मुले अन् प्रवाशी होते. गाडी बंद पडल्याने सायंकाळचे ७ वाजले तरी काही प्रवाशी येथेच थंडीत कुडकुडत बसले होते. याच मार्गावर साडे सहा वाजता सांगोला-जत ही एसटी असते. पण तीही साडे सात वाजले तरी त्या ठिकाणी आली नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गांचे बेहाल झाले. .
सकाळची गाडी पुन्हा याच मार्गावर खोळंबा करीत असेल तर प्रमुख काय करतायेत? वर्कशॉप विभागावार यांचे नियंत्रण नाही का? आज मोठेपणाने गाड्याच सुस्थितीत नाहीत. त्यामुळे बंद पडत आहेत,असे ते प्रमुख सांगत आहेत. आज याच गाडीच्या दिवसभरात दोन घटना घडल्या, पण यांच्यावर राजकारण करणाऱ्या आगार प्रमुखाला कोण वठणीवर आणणार?
कडलाससारखीच घटना
गुरुवार ९ जानेवारी रोजी सांगोला आगारातील एकाच एसटीने दोन वेळा त्याच मार्गावर खोळंबा केला. सकाळी घडलेली घटना तर डेंजरच होती. त्याच वेळी सकाळी त्या गाडीच्या चालकाने रिमार्क मारला होता. मग या गाडीचे काम आगारात काय केले? हे आगार प्रमुखाला दिसले नाही का? पण स्वतःच्या गुर्मीत असलेल्या याच प्रमुखामुळे तालुकावासियांना त्रास सोसावा लागत आहे.
याच मार्गावर धावतात उशिराने गाड्या
मनमानी कारभार करणाऱ्या प्रमुखाला या मार्गाचे काय वावडे आहे, हे समजत नाही. गेली महिनाभराचा कालावधी उलटला. गाड्या कधीच वेळेवर सोडल्या जात नाहीत. २० वर्षाच्या जुन्या गाड्यांनाही हा प्रमुख खोडा घालत आहे. या गाड्या अ वर्गातील आहेत. आजच याच मार्गावर दुपारी १२:३० वाजता जाणारी जत ही तब्बल २:३५ वाजता सांगोला आगारातून सोडण्यात आली. त्यानंतर हीच गाडी ५:३० वाजता याच मार्गावरून जत मुक्कामी असते. पण ही गाडीही ६:३० वाजता आगारातून निघाली. याच गाडीतून या पारे तलावाजवळ बंद पडलेल्या गाडीसाठी मेकॅनिकल आले. येथे प्रवाशी अन् चालक-वाहक यांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला.
रिमार्क मारून काय दुरुस्ती केली?
गुरुवारी सकाळी याच नराळे एसटीने कडलास गावात खोळंबा केला होता. त्यानंतर आगारात तीन तासांनी गेलेल्या एसटीबाबत चालकाने रिमार्क मारला होता. येथे वर्कशॉप प्रमुख, आगारप्रमुख याने काय काम केले? परत याच मार्गावर अशा नादुरुस्त गाड्या सोडून हे प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत.
ज्यावेळी पहिल्या वेळीस कडलास गावाजवळ सकाळी ७:४० वाजता ही घटना घडली त्यावेळी मोठी दुर्घटना टळली, असे चालकाने सांगितले. नंतर आगारात गेल्यावर रिमार्क मारला. पण स्वतःला शहाणे समजणारे प्रमुख पुन्हा याच मार्गावर अशा गाड्या सोडून प्रवाशांच्या जीवावर उठत आहेत. यांच्यावर कोणाचा अंकुश आहे की नाही? का तालुक्याला कोणी वालीच नाही.आज हवेची पाइप फुटून, ब्रेकफेल सारख्या घटना होत असताना, हे प्रमुख हलक्यात घेत आहेत.
सांगोला तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांत अनागोंदी माजली आहे. हात ओले केल्याशिवाय कामे होत नाहीत. सरकारी नियम दाखवून गोरगरिबांना छळले जाते आणि दोन नंबर धंदेवाल्यांना अभय दिला जातो. यावर “थिंक टँक” निर्भिडपणे आवाज उठवेल. जनतेच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहू. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी अथवा प्रश्न असल्यास नक्की संपर्क साधू शकता. – डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) : 7972643230)