सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील जवळा येथे पिकअप – दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात माजी प्राचार्य अप्पासाहेब इंगळे (वय ७२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराकडून गावाकडे येत असताना भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इंगळे वस्ती येथे घडली.
अप्पासाहेब इंगळे हे अष्टपैलू शिक्षक होते. त्यांना खेळाची विशेष आवड होती. माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील तसेच जवळा गावातील प्रसिद्ध व्यापारी विलास कोरे यांच्यासोबत त्यांनी क्रिकेटचे अनेक सामने गाजविले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला उत्तम खेळाडू, शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.
जवळा गावातील कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. ते गणित विषयाचे अभ्यासू शिक्षक होते. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जवळा गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची सांगोला पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?