सांगोला : बाळासाहेब मागाडे
सांगोला विधानसभा मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरी ५७ टक्के मतदान झाले असले तरी सांगोला मतदार संघाने मात्र बाजी मारत येथे तब्बल ६४.३० टक्के मतदान झाले आहे. ही सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. यात आणखी वाढ होऊ शकते.
वाढलेला टक्का कुणाचा?
सोलापूर जिल्ह्यात सर्व मतदारसंघात सरासरी एकूण 57.09% मतदान झाले. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल ६४.३० टक्के मतदान झाले. मतदानाचा हा वाढलेला टक्का नेमका कोणाच्या पारड्यात पडला आहे हे येथे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून अत्यंत चुरशीने मतदान झाले. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी तुफान गर्दी दिसून येत होती. विशेषता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या जवळा, महुद, घेरडी, कोळा, भाळवणी या भागातील मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून मतदान घडवून आणले. घरोघरी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिळेल त्या वाहनातून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद मराठी शाळा येथे मतदान केले. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला येथे मतदान केले तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी चिकमहूद येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. या तिन्ही नेत्यांनी तालुक्यातील या मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या.