निवडणूक विश्लेषण / डॉ. नाना हालंगडे
सांगोला मतदारसंघात नवख्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राजकारणात मुरलेल्या दोन्ही आजी-माजी आमदारांना कात्रजचा घाट दाखवत अस्मान दाखविले असून मतदारसंघात घासुन नाही तर ठासून २५ हजार ३६८ मतांनी दणदणीत विजय मिळवत एक प्रकारे” यहा के हम ही सिकंदर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय गणिते परत एकदा देशमुख बंधूंच्या भोवतीच राहणार असल्याचे सिध्द झाले आहे.
काय झाडी काय डोंगर, काय हाटील सगळं काही ओके मधी हाय या डायलॉगने प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील व उबाठाचे दिपकआबा साळुंखे यां दोघांचा दारुण पराभव झाला आहे. तर शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी नामसाधर्म असलेला अपक्ष म्हणून बाबासो गणपत देशमुख या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता त्याला फक्त ४६० मते मिळाली आहेत.
सांगोला मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पण खरी लढत शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख,शिवसेनेचे शहाजीबापू पाटील व उबाठाचे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह अन्य १३ उमेदवार रिंगणात होते. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना १ लाख १६ हजार २५६,शहाजीबापू पाटील यांना ९० हजार ८७० तर दिपकआबा साळुंखे पाटील यांना ५० हजार ९६२ एवढी मते पडली तर पोस्टल मतदानामध्ये डॉ.बाबासाहेब देशमुख १३४२, शहाजी पाटील ५४५, दिपक साळुंखे ७३८ मते मिळाली आहेत.
शशिकांत गडहीरे बसप ८४८, राघू घुटुकडे ९७२, एकनाथ शेंबडे १६४, बाबासो देशमुख ४६०,परमेश्वर गेजगे २६५, बाळासाहेब इंगवले १४२, मोहन राऊत ३२३, रणसिंह देशमुख ५०३, राजाराम काळेबाग ५२०, ज्ञानेश्वर उबाळे २७९, यापैकी कोणीही नाही (नोटा) ११०६.
शेतकरी कामगार पक्षाने सुरवातीला डॉ.बाबासाहेब देशमुख व बंधू डॉ.अनिकेत देशमुख यांच्यात एकमत घडवून अंतर्गत मतभेद नसल्याचे जाहीर करून डॉ.बाबासाहेब यांची उमेदवारी जाहीर केली.त्यावेळीच डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर शेकापने पक्षातील नाराज नेत्यांमधील रुसवे फुगवे मिटवून प्रचारास सुरूवात केली. एकसंघ शेकापला मागील निवडणुकीतील अल्पमताने झालेला पराभव जिव्हारी लागल्याने, शेकाप कार्यकर्ते एकजुटीने पेटून उठला होता. गावपातळीवरील अंतर्गत सर्व मतभेद विसरून कामास लागला व प्रचारात आघाडी घेतली. त्यामूळे शेकापने अर्धी लढाई तिथेच जिंकली होती.
डॉ.बाबासाहेब व डॉ.अनिकेत यांनी आततायीपणा न करता मुद्द्याला धरून नियोजित प्रचार केला व यश प्राप्त केले.” आबासाहेब प्रती बाबासाहेब ; असे म्हणून कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून महाविकास आघाडीकडून खा. धैर्यशील मोहिते पाटील वगळता एक ही मोठा नेता शेकापच्या प्रचारात सामील झाला नाही.महाविकास आघाडीकडून कोणतीही रसद ग्रहीय न धरता शेकापने कार्यकर्त्यांच्या स्वबळाच्या जोरावर आजचा विजयरथ दृष्टीपथात आणला आहे. तर आमदार शहाजी बापू पाटील यांनी विकास कामाच्या जोरावर आपण तरून जाऊ अशी भाबडी आशा होती. ती फोल ठरली आहे.तर दिपकआबा साळुंखे पाटील हे हे तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याने त्यांचा मतदार संघात किती आवाका आहे हे पहिल्यांदाच सिद्ध झाले आहे.
सांगोला मतदार संघाच्या मतमोजणीच्या सुरुवातीला पहिल्या फेरीत डॉ. बाबासाहेब देशमुख हे १३८ मताने आघाडीवर होते.दुसऱ्या फेरीमध्ये शहाजी पाटील यांनी हे लीड कमी करून १८९ मतांची आघाडी घेतली होती.पण त्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तिसऱ्या फेरीपासून शेवटच्या २३ फेरीपर्यंत डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे लीड वाढतच गेले.बाबासाहेब देशमुख यांचे जसजसे लीड वाढत जाऊ लागले तसतसे शहाजी पाटील व दीपकआबां साळुंखे यांचे कार्यकर्ते आपली नाराजी लपवू शकले नाहीत.
विजयी उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांची उघड्या जीपमधून विजय रॅली काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,अंबिका देवी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासह शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना रॅलीने जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तिसऱ्या फेरीनंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे मताधिक्य वाढल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत गुलालाची मुक्तपणे उधळण केली. शहरातील प्रमुख चौकात जेसीबीच्या साह्याने गुलालाची उधळण होत होती. तर काही उत्साही तरुण दुचाकीच्या पुंगळ्या काढून आपला आनंद व्यक्त करीत होते. तालुक्यातल्या ग्रामीण भागात ही कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने शेकडो टन गुलालाची उधळण केली. मागील निवडणुकीत शेकापचा अल्पमताने पराभव झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला होता,रॅलीमध्ये दिवंगत लोकनेते गणपतराव देशमुख , डॉ. बाबासाहेब व अनिकेत देशमुख यांचे बॅनर घेऊन कार्यकर्ते नाचत होते.
आजचा दणदणीत विजय हीच आबासाहेबाना श्रद्धांजली असे बॅनर रॅलीमध्ये लक्ष वेधून घेत होते.निवडणूक निकाला वेळी निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे डॉ.संदीप भंडारे, डॉ. सुधीर गवळी यांचे सोबत १०० अधिकारी व कर्मचारी मतमोजणी कामासाठी उपस्थित होते.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पो.नि.भीमराव खणदाळे, जे.डी. मेहरसिंग इन्स्पेक्टर आयटीबीपी व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे सव्वातीन वर्षांपूर्वी कोलकत्ता येथून आपले एमडी चे उच्च शिक्षण पूर्ण करून सांगोला मतदार संघात दाखल झाले, दिवंगत गणपतराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांनी सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यात झालेली पोकळी भरून काढीत आपला जनसंपर्क वाढविला, समारंभ कोणताही असो डॉ. बाबासाहेब यांना एक फोन केला की ते लगेच हजर, रात्री निम्म्या रात्री त्याना फोन केला की ते तात्काळ उपलब्ध होत असत त्यामुळे गेल्या तीन वर्षात डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण केले व जनतेला आपलेसे केले आज झालेल्या निकालावरून डॉ.बाबासाहेब देशमुख हे विजयी झाल्याने त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बाबासाहेब अन् बापू युती दिसेल?
सांगोला तालुक्यात शेकाप पक्ष काय आहे? हे एकदाचे सिद्ध झाले आहे.गतवेळच्या काही निवडणुका सोडल्या तर आजही तालुक्यात शेकाप अव्वलस्थानी आहे.ज्यांना स्व.आबासाहेबांनी काही भरभरून दिले,त्यांनीच काय त्यांच्या बगलबच्यानी कधीच मदत केली नाही.त्यामुळे तर अशाना तालुक्यातील जनतेनेच चोख उत्तर दिले.
आता इथून पुढे ज्या काही नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होतील त्यात,बापूंना सामावून घेतले जाईल,अशी चर्चा ईकू येत आहे.त्यामुळे तालुक्यात इथून पुढे बाबासाहेब अन् बापूच पर्व पाहण्यास मिळण्याची दाट शक्यता आहे.