सांगोला तालुक्यात ४० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी
अडीच हजार हेक्टरवर गव्हाची लागवड
पीकपाणी वार्तापत्र/डॉ.नाना हालंगडे
यंदा सांगोला तालुक्यात मान्सून ते परतीच्या पावसापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामात सुमारे ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर (८८.४६ टक्के) समाधान कारक पेरण्या झाल्या आहेत दरम्यान पेरणीनंतर पिकांची उगवणही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरण्या ५० टक्क्यांवर झाल्या असून गहू पिकाची पेरणी अडीच पटीने वाढली आहे. तसेच ३ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली आहे.
सांगोला हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरी उपलब्ध पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकडे शेतकर्यांचा नेहमीच कल राहिला आहे. गेल्या पाच वर्षात तालुक्याला टेंभू म्हैसाळ योजनेतून तसेच निरा उजवा कालवा सिंचन प्रकल्पासह पावसाचे पाणी मिळाल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिक पेरणी सह फळबाग लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.
यंदा सांगोला तालुक्यात २१ हजार ४८५ हेक्टर (५७.३३ टक्के) क्षेत्रावर रब्बी ज्वारी, २ हजार ३५१ हेक्टर (२८६ टक्के) क्षेत्रावर गहू, १३ हजार ३२१ हेक्टर (२५८ टक्के) क्षेत्रावर मका, २ हजार ०२६ हेक्टर क्षेत्रावर (२६३ टक्के) हरभरा, इतर कडधान्य ३९ हेक्टर, जवस २४ हेक्टर, भुईमूग ६३ हेक्टर, करडई ३२ हेक्टर अशा ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तसेच मका १ हजार ८२४ हेक्टर, ज्वारी १ हजार २८० हेक्टर अशी ३ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेतली आहेत. कांदा ४४ हेक्टर, ३८ हेक्टर टोमॅटो, मिरची ११७ हेक्टर, वांगी ७७ हेक्टर, भेंडी ४ हेक्टर, दोडका ९ हेक्टर, घेवडा १ हेक्टर, कारले १० हेक्टर, शेवगा ४६ हेक्टर अशी ३४६ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिके घेतली आहेत.तालुक्यात ६४६ हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस, ५४६ हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी ऊस, १९ हेक्टर क्षेत्रावर खोडवा ऊस अशी १२०४ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे.
यंदाच्या हंगामात आंबा ६४ हेक्टर, डाळिंब १३३ हेक्टर, अंजीर ५ हेक्टर, लिंबू १ हेक्टर, पेरू ५५ हेक्टर, सीताफळ १३ हेक्टर, बोर २३ हेक्टर, केळी १७८ हेक्टर, पपई १ हेक्टर, कलिंगड १८ हेक्टर, खरबूज ३१ हेक्टर, ड्रॅगन फ्रुट ३ हेक्टर अशी ५२५ हेक्टर क्षेत्रावर नव्याने फळबाग लागवड वाढली असल्याची माहिती दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी दिली.