
राजकीय वार्तापत्र / डॉ. नाना हालंगडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने सध्या निवडणूक आयोगाने अद्याप शासकीय यंत्रणेला कोणताही आदेश दिला नाही, परंतु शासनाने मात्र प्रभाग रचना सप्टेंबर 25 अखेरपर्यंत निश्चित करण्याबाबत नियोजनाचा कार्यक्रम दिल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे अध्यक्षतेखाली चार अधिकाऱ्यांची समिती कार्यरत झाली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांची परिस्थिती पाहता तालुक्यातील आजी-माजी आमदार सध्या संभ्रमावस्थेत दिसत आहेत. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत व उद्योगपती बाळासाहेब एरंडे हे फार्मात असून नगरपालिकेसाठी भाजपाला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. सांगोला तालुक्यातील एकूण चित्र “नेत्यांचे जमेना, कार्यकर्त्यांना सुचेना” असेच दिसून येत आहे.
तालुक्यात पूर्वी स्व. गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे-पाटील हे तीन नेते जे शहर व तालुक्यासाठी काही निर्णय घेतले तर ते तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असे. कार्यकर्तेही त्यांच्या निर्णयाचा सन्मान करीत असत.
परंतु 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बदलले गेले आहे. दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा पराभव झाल्याने व त्यांनी तातडीने शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्याने ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. भाजपमध्ये प्रवेशासाठी त्यांचा प्रयत्न जोरात सुरू आहे. परंतु त्यांना प्रवेशासाठी विलंब लागत असल्याने त्यांचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढणार आहे. परंतु पूर्वी असलेले व पुन्हा पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची ताकद कमी होईल अशी भीती असल्याने साळुंखे-पाटील यांचा प्रवेश लांबत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
शेकाप हा शहर व तालुक्यातील मोठा पक्ष असून कार्यकर्त्यांचे व मतदारांचे केडर असल्याने केडर पक्ष म्हणून पाहिले जाते. परंतु स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यानंतर या पक्षाला फुटीची लागण लागलेली आहे. बरेचसे कार्यकर्ते सध्या भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. विधानसभेच्या निवडणुकीप्रसंगी डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या चुलत बंधूंनी मतभेद विसरून एकत्र येऊन विधानसभेची निवडणूक जिंकली. परंतु त्यानंतर गेली सहा ते सात महिन्यात पुन्हा कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
विधानसभेचे त्यावेळचे इच्छुक उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांना मानणारे कार्यकर्तेही सध्या संभ्रमावस्थेत असल्याने एकसंघ शेकापमध्येही सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. परंतु मतदार मात्र शेकापकडे ठाम असल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीस कालावधी जास्त असल्याने शेकापमध्ये वादळापूर्वीची शांतता असल्याची चर्चा आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील आमदार असताना थकलेले दिसत होते.परंतु माजी आमदार झाल्यानंतर सध्या मात्र मोठ्या जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत. सातत्याने दर आठवड्याला मुंबईला जाऊन मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन विकासाच्या योजना आणण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अद्याप तरी त्यांनी फारशी मनावर घेतलेली नाही आणि ते कधी घेतही नाहीत. कारण त्यांचे महत्त्वाचे लक्ष फक्त विधानसभा असते. ऐनवेळी कोणाबरोबर तरी युती करतील व धोबीपछाड डाव मारतील हे काही सांगता येत नाही. कारण मुत्सदी चाणाक्ष राजकारणी असल्याने ते केव्हा कोणता डाव बाहेर काढतील हे काय सांगता येत नाही. ते जरी महायुतीत असले तरी महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांबरोबर त्यांचे फारसे सख्ख्य दिसत नाही. कारण पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत हे सध्या शहर व तालुक्यापेक्षा पश्चिम जिल्हा सोलापूर व राज्य पातळीवरच ते जास्त रमलेले दिसत आहेत. त्यांनी राज्य पातळीवरील सर्वच नेत्याबरोबर अल्पावधीत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याचा फायदा तालुक्यासाठी होणे ही गरजेचे आहे. शेकापचे उद्योगपती बाळासाहेब एरंडे हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जवळचे मित्र असल्याने त्यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यासाठी विकासाची कामे मिळवण्याचा प्रयत्न चालू असल्याने नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलतील अशीही चर्चा चालू आहे.
प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याकामी समिती गठीत केली असून मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी हे समितीचे अध्यक्ष आहेत. तर सदस्य म्हणून नगरपालिकेतील अधिकारी सचिन पाडे, आकाश गोडसे, रोहित गाडे व अस्मिता निकम यांची नियुक्ती केली आहे. ही समिती शासनाच्या आदेशावरून गठित आहे निवडणूक आयोगाकडून तसा आदेश नसल्याने सदर समिती ही कायदेशीर का बेकायदेशीर हे निवडणूक आयोग ठरवेल व त्यानुसार त्यांनी केलेल्या प्रभाग रचनेस मान्यता देतील. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सावध पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहेत.