
सांगोला : विशेष प्रतिनिधी
प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये माझ्या नावाची उलट सुलट चर्चा सुरू आहे मात्र, मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे माझे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान याबाबत मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची भूमिका सध्या तटस्थ आहे. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. मी कोणत्या पक्षात जाणार याबाबत येणारा काळ ठरवेल असे ही त्यांनी सांगितले आहे. यामुळे प्रसार माध्यमातून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला मा. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक आबा साळुंखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगोला विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून शहाजीबापू पाटील आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर दीपक आबा साळुंखे पाटील हे शिवसेना पक्षापासून चार हात लांबच राहिले. त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयावरील शिवसेनेचे चिन्ह हे हटविले. त्याच वेळेस त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत लोकांना उत्सुकता लागली होती. सध्या दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पडेल असे चर्चा सुरू होत्या.
मात्र दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मी त्या पक्षाचा सदस्य नसल्याने होत असलेल्या चर्चा बिनबुडाच्या असल्याचं अगदी स्पष्ट सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवेशाबाबतचा त्यांचा निर्णय अगदी स्पष्ट झाला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाहीत असे स्पष्ट आहे. दीपक आबा साळुंखे पाटील हे सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.