सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला शहरातील मिरज रोडवरील महात्मा नगर येथे नळाला चक्क गटारीचे मैलामिश्रित पाणी येत आहे. मागील दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. अशा घाण पाण्यामुळे या भागात आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगोला शहरातून मिरजकडे रस्त्यावर महात्मा नगर आहे. रेल्वे बोगद्यालगत हा परिसर आहे. ही मोठी लोकवस्ती आहे. या भागात नगरपालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये गटारीचे मैला मिश्रित पाणी येत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत आहे. मागील दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना कळविले आहे. मात्र त्यांनी ही बाब जास्त मनावर घेतली नाही. कोणीही अधिकारी या प्रश्नाची दखल घ्यायला तयार नाही.
आम्ही अनेक दिवसांपासून या भागात राहतो. नगरपालिकेचा कर नियमितपणे भरतो. मात्र नगरपालिकेकडे पुरेशा सुविधा मिळत नाहीत. नळाला गटारीचे पाणी येत आहे. या पाण्याला मोठी दुर्गंधी येत आहे. नगरपालिका अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी चंद्रकांत खांडेकर (रहिवासी) यांनी केली आहे.