
चर्चा तर होणारच / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात दिवाळीपूर्वीच आरोपांचा सुतळी बॉम्ब फुटणार असे दिसतेय.. सांगोल्याच्या राजकारणात प्रचंड चुरस दिसतेय. थेट तिरंगी लढत होणार हे चित्र जणू स्पष्टच झाले आहे. पण कोणाची किती दमदार कामगिरी, पुढील पाच वर्षे आपला वाली कोण? हे ओळखून असलेली जनताच कुणाला निवडून द्यायचे आणि कुणाला चितपट करायचे याचा निर्णय घेऊ शकते.
मलाच आमदार करा! म्हणून अनेकांनी बारामतीची वारी केली. पण हा पांडुरंग भेटतो पण पावत काही नाही, हा इतिहासही आता चर्चिला जात आहे. डाव – प्रतिडावावर कैकांना लोळविणारा खतरोंका खिलाडी अवघा महाराष्ट्र जाणतो.
सद्या सांगोल्याच्या विधानसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न चांगलाच गाजतोय. सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर अशीच अवस्था झाली आहे. सांगलीची चूक उबाठा गटाने केली पण त्यांना तिथे भोगावेच लागले. आताही सर्वच असेच झाले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पहिल्या यादीत चूक झाली? असेही खा. संजय राऊत बोलत आहेत. दक्षिण सोलापूर अन् सांगोल्यातही असेच झाले आहेत. घोषित केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मही दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या या धक्का तंत्राने महाविकास आघाडी अस्वस्थ दिसत आहे. एबी वाटून झाल्यावर “ती तांत्रिक चूक होती” हे सांगून काय उपयोग होणार? एबी फॉर्म मिळताच तिकडे मशाली पेटल्या आहेत. या मशाली थंड करणे आता वरचा देव खाली आला तरी शक्य नाही.
तांत्रिक चूक का असेना मात्र ही चूक दुरुस्त करून मशाली थंड होतील या भाबड्या अपेक्षेवर असलेल्या विरोधकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.