सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.अभिषेक कांबळे यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना भेटून सांगोला तालुक्यात रोडरोमीओंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोनच दिवसांत सांगोला पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाने महूद येथील शाळा परिसरास व मुख्य चौकात भेट देत रोडरोमिओवर धडक कारवाई केली. अशाप्रकारे वारंवार कारवाई होण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड्.अभिषेक कांबळे यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी सांगोला तालुक्यात चोऱ्या, छेडछाड, मारहाण, खून यासारखे गंभीर प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले होते. शिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱ्या टोळ्या तालुक्यात सर्वत्र वाढत चालल्या आहेत. ही टवाळखोर मुले व रोडरोमिओ दारू, गांजा यासारख्या अंमली पदार्थांचे सेवन करून शाळेतील मुलींना व त्यांच्या पालकांना धमकाविण्याचे प्रकार करत आहेत. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तरीही पोलीस प्रशासन याची कोणतीही गंभीर दखल घेत नसल्याने सामान्य नागरिकांच्या मनामध्ये पोलीस प्रशासनाच्या विषयीची विश्वासार्हता कमी झाली आहे. शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना शाळेत जाणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे तालुक्यात मुलींच्या शिक्षणासाठी निर्भय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनाच्या प्रती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या.
महूद व परिसरातील असंख्य मुली येथील शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. या मुली पायी चालत, सायकलवर, वाहनाने, एसटी बसने शाळेला येतात. तेव्हा सकाळच्या वेळेला तसेच येथील ज्युनिअर कॉलेज सुटताना शिवाय शाळा भरताना व सुटताना येथील मुख्य चौकात तसेच शाळा परिसरात टवाळखोर व रोडरोमिओ यांचा मोठा सुळसुळाट असतो.
याबाबत येथील काही शाळांनी यापूर्वीही सांगोला पोलिसात निवेदन देऊन या टवाळखोरांचा व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने येथे टवाळखोर, गावगुंड आणि रोड रोमिओ तरुणांचे मोठे फावले होते. त्यातून अनेक गंभीर गुन्हेही घडू लागले आहेत. तरीही पोलीस प्रशासन कोणत्याही ॲक्शन मोडवर येताना दिसत नव्हते.
आज अचानक निर्भया पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी लवकर निर्भया पथक दाखल झाले. येथील शाळा परिसर व मुख्य चौकात रस्त्याने हिंडणाऱ्या टवाळखोर तरुणांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी येथील श्री शिवाजी विद्यालयात विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. शिवाय मुलींना काही अडचण असल्यास त्यांनी निर्भया पथकाला ताबडतोब कळवावे असे सांगितले. तसेच मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे व दुरुपयोगामुळे गुन्हेगारी वाढत आहे. तेव्हा त्याचा जपून वापर करावा असा सल्ला दिला. तर विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम ही समजावून सांगण्यात आले. अशाप्रकारे येथील शाळा परिसरात व मुख्य चौकात निर्भया पथकाची वारंवार कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.