सांगोल्यात ७२ वर्षांपासून धनगर विरुद्ध मराठा असाच सामना
तेरावेळा धनगर समाजाचा उमेदवार विजयी

सांगोला विधानसभा मतदारसंघातील राजकीय जय – पराजयाचा इतिहास खूपच रंजक आहे. इथं कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं हे ठरवणारा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जाते. या मतदार संघात तब्बल तेरावेळा धनगर समाजाचा उमेदवार विजयी झाला आहे. इथं धनगर विरुद्ध मराठा समाजाच्या उमेदवारांत चुरशीची लढत होत आली आहे. याच रंजक अशा राजकीय इतिहासाचा डॉ. नाना हालंगडे यांनी घेतलेला हा वेध..
सांगोल्याचा राजकीय इतिहास काय सांगतो?
सोळा वेळा निवडणुका
सांगोला विधानसभा मतदारसंघात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजेच १९५२ पासून सोळा वेळा निवडणुका झाल्या. त्यामध्ये तेरा वेळा आमदार धनगर समाजाचे तर तीन वेळा मराठा समाजाचे उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात पक्षीय फॅक्टर चालत नसून जात फॅक्टर चालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत युती अथवा आघाडीचा फॅक्टर चालेल? की, जात फॅक्टर चालेल? हे अगदी महिनाभरात दिसून येईल.
यावेळीही शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख विरुद्ध युतीतील शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील व आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्यात लढत होत आहे. येथेही धनगर विरुद्ध मराठा अशीच लढत होण्याची शक्यता आहे.
१९५२ व १९५७ ला काँग्रेस पक्षातर्फे धनगर समाजाचे मेडशिंगीचे केशवराव राऊत हे पहिले आमदार झाले. त्यांनी शिंपी समाजाचे रावसाहेब पतंगे यांचा पराभव केला. त्यानंतर १९६२ मध्ये काँग्रेसतर्फे पुन्हा केशवराव राऊत व धनगर समाजाचे शेकापचे गणपतराव देशमुख यांच्यामध्ये लढत होऊन गणपतराव देशमुख हे पहिल्यांदाच विजयी झाले. त्यानंतर १९६७ पासून धनगर विरुद्ध मराठा अशीच लढत झाली. त्यामध्ये १९६७ साली गणपतराव देशमुख विरुद्ध काकासाहेब साळुंखे – पाटील यांच्यात लढत झाली. देशमुख विजयी झाले. १९७२ ला पुन्हा दोघांमध्येच लढत झाली. परंतु त्यावेळी काकासाहेब साळुंखे – पाटील यांनी बाजी मारली व ते विजयी झाले. मात्र दुर्दैवाने दीड वर्षातच त्यांचे निधन झाले.
१९७४ च्या पोटनिवडणुकीत गणपतराव देशमुख विरुद्ध लिंगायत समाजाचे राजाभाऊ झपके यांच्यामध्ये लढत होऊन देशमुख पुन्हा विजय झाले. १९७८ च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. शेकापतर्फे गणपतराव देशमुख व एस काँग्रेस म्हणजे शरद पवार काँग्रेसकडून मराठा समाजाचे बबनराव घाडगे व इंदिरा काँग्रेसतर्फे मराठा समाजाचे चिकमहूदचे ईश्वर बाळा पाटील यांच्यात लढत होऊन देशमुख विजयी झाले.
१९८० व १९८५ साली शेकापचे गणपतराव देशमुख विरुद्ध काँग्रेसचे शिंपी समाजाचे महूद बुद्रुकचे पांडुरंग भांबुरे यांच्यात लढत झाली. परंतु त्यावेळी ते कमी फरकाने दोन्ही वेळा पराभूत झाले. १९९० व १९९५ ला गणपतराव देशमुख विरुद्ध काँग्रेसचे शहाजी पाटील यांच्यात लढत झाली. येथे धनगर विरुद्ध मराठा अशीच लढत झाली. गणपतराव देशमुख विजयी झाले, तर १९९५ साली शहाजी पाटील केवळ १९२ मतांनी विजयी झाले.
१९९९ ला शेकापचे गणपतराव देशमुख, काँग्रेसतर्फे डॉ. अमर शेंडे व अपक्ष म्हणून शहाजी पाटील यांच्यात लढत झाली. शेंडे व पाटील हे दोघेही मराठा असून खरी लढत देशमुख विरुद्ध पाटील यांच्यात झाली होती. त्यात पाटील यांचा चाळीस हजार मताधिक्याने पराभव झाला.
२००४ मध्ये शेकापचे गणपतराव देशमुख व काँग्रेसचे शहाजी पाटील यांच्यात पुन्हा लढत झाली. मात्र, पाटील यांचा पराभव झाला.
१९९०, १९९५, २००४ ला भाजपातर्फे डॉ. गणपतराव मिसाळ व इतरांनी निवडणूक लढवली. परंतु ते पराभूत झाले. २००९ ला भाजपने सांगोल्यामध्ये विजयाचा मेळ लागत नाही म्हटल्यानंतर त्यांनी सांगोल्याची जागा शिवसेनेला दिली व मिरजेची शिवसेनेची जागा भाजपने घेतली दिली. कारण त्यावेळी भाजप – शिवसेना युती होती. त्यावेळी शेकापतर्फे गणपतराव देशमुख व काँग्रेसतर्फे शहाजी पाटील आणि रघुनाथ पाटील यांची शेतकरी संघटना व शिवसेनेची युतीतून बाळासाहेब वाळके यांच्यात लढत झाली. सदर जागा शिवसेनेने शेतकरी संघटने बरोबर युती झाल्याने तेथे शेतकरी संघटनेला जागा सोडली.

२०१४ ला युती व आघाडीचे राजकारण सुरू झाले. शेकापचे गणपतराव देशमुख व शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्यात लढत झाली. त्यात देशमुख हे विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी वयोमानानुसार निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना शेकापची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत अनिकेत देशमुख यांनी शिवसेना-भाजप युतीचे शहाजी पाटील यांच्याशी लढत दिली. पाटील हे ७६८ मतांनी विजयी झाले.
या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी २०१९ ला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना घड्याळाचे चिन्ह मिळाले होते. परंतु आघाडीचा धर्म पाळला पाहिजे म्हणून अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने साळुंखे – पाटील यांना पाठिंबा नसल्याचे जाहीर केले व गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. साळुंखे – पाटील यांची उमेदवारी व घड्याळ चिन्ह तसेच राहिले. त्यांनी निवडणूक न लढविता शहाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. पाटील त्यावेळी ७६८ मतांनी विजयी झाले आणि घड्याळ चिन्हाला तरीही ९१५ मते मिळाली होती.
विचारसरणीपेक्षा जातीवर निवडणूक
१९५२ पासून २०१४ पर्यंत या निवडणुकीत पक्षीय विचारसरणीपेक्षा जातीवर निवडणूक झालेली दिसून येत आहे. यावेळीही शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख विरुद्ध युतीतील शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील व आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्यात लढत होत आहे. येथेही धनगर विरुद्ध मराठा अशीच लढत होण्याची शक्यता आहे. अल्पसंख्यांकमध्ये लोणारी दलित मुस्लिम, लिंगायत, यलमार आदी समाजातील मतदारावरच विजयाचे गणित आहे. आत्तापर्यंत यातील काही समाजाचा पाठिंबा कायमस्वरूपी शेकापला मिळत होता. आता स्व.गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर दुसऱ्यांदा निवडणूक होत असल्याने हा समाज काय भूमिका घेणार यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.