ताजे अपडेट

पप्पा तुम्हाला आठवताना….!

सारिका भंडारे

Spread the love

प्रिय पप्पा… तुमचा आज सहावा पुण्यानुमोदन दिन.  आज तुम्हाला अनंतात विलीन होऊन फार काळ लोटला. असं वाटतं की, जणू काही तुम्ही तुमच्या नातवंडांना खेळवत आहात… आज बुद्धवाशी राजशेखर मारुती भंडारे म्हणताना अंतःकरण जाड जातं. ह्या पाच वर्षांत खूप काही घडून गेलं. असं म्हणतात ना की कुणाच्या जाण्याने जीवन जगायचं थांबत नसतं. हे जरी तितकंच खरं असलं तरी त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही. काळानुसार सर्व काही बदललं.. नाती, वेळ, काळ, पैसा, परिस्थिती. पण बदलली नाही ती तुमच्याबद्दलची जागा…

“पप्पा” या शब्दाचा अर्थ उच्चारतांना समोर दिसतो तो तुमचा चेहरा.. काळजीचा, “बप्पू तुझा युनिफॉर्म प्रेस करून ठेवला आहे.. मी लवकर जाईन ऑफिसला श्रीकांतभाऊ आज लवकर येणार आहे… आणि तू गाडी हळू चालव नीट सांभाळून जा ऑफिसला…”

पप्पा, आज जरी गाडी ६० च्या स्पीडने असली तरी आज कानावर तुमचे शब्द नाहीत. तुमच्याशिवाय आज ऑफिसच्या युनिफॉर्मला मज्जाच नाही. लेक मॅनेजर म्हणून शोभून दिसावी म्हणून केलेला अट्ठाहास.. आज एक ना अनेक गोष्टी मनात घर करून राहिल्यात. आज पप्पा  अंगावरती आज जो “व्हाईट कॉलर” आहे ती सर्व तुमचीच देण आहे..

आज तुमची कोणती कोणती आठवण सांगून ओठावर हास्य निर्माण करू अन तुमची कोणती आठवण काढून डोळ्यातील आसवांना स्थिर करू…? अश्या अनगिनत तुमच्या सवयी मनात घर करून आहेत. तितकीच तुमची पोकळी न भरणारी आहे.

तुमचं असणं म्हणजे घराला घरपण होतं. आज त्याच घराच्या भिंती ह्या बोलू लागल्या तुमच्या नसण्याने.

आज मी तुम्हाला सर्वत्र शोधतीय, त्याच बेडरूममधल्या खोलीत, लेटर पॅडमधल्या  ठेवलेल्या गाडीच्या चावीमध्ये, आज मी तुम्हाला शोधतीय झोपल्यावरती हळूच अंगावरती मायेची चादर घालताना, पप्पा आज मी तुम्हाला शोधतीय त्याच  एलआयसीच्या ऑफिसमध्यल्या कॅबिन मध्ये… त्याच बँकेच्या पासबुकमध्ये, चंद्रादेवीच्या मंदिराच्या कळसामध्ये… पण तुम्ही कुठेच नसल्याचा भास आज…

स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या इर्षेशिवाय कर्तृत्व घडत नाही..  हे तुमच्या शिवाय कुणास ठाऊक… पप्पा आज तुमच्यातला आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि लोकांना ओळखण्याची दूरदृष्टी ठाई  ठाई उपयोगी पडली…

पपांना  गिळणारी काळरात्र

आता सरली होती

झाले पोरकी मी

चिंता मनी उरली होती

डोळ्यातले पाणी

अजूनही नव्हतं आटलं

वाटलं होतं जणू

आकाशच फाटलं

धगधगत्या रक्षेत

अस्थी गोळा करत होते

विनाशाच्या ढिगाऱ्यात

जीवनाचे अंश शोधत होते

अस्थी गोळा करताना

डोळे पुन्हा भरले

अनमोल अशा जीवनाचे

फक्त मूठभर सार उरले

ज्या नदीकाठी जीवनाचा

पहिला धडा गिरवला

तिथेच आज आले

शेवटचा निरोप द्यायला

पवित्र त्या अस्थिंना

जड मनाने फुलं वाहिली

नकळत झालेल्या चूकांची

आज कबुली मी दिली

विरहाच्या त्या आघाताने

माझेच पाय लटपटले

आज तुमच्याच नातवंडांकडून पप्पा तुम्हालाही वंदना…

बुद्धम शरणम गच्छामि

धम्मम शरणम  गच्छामि

संघम शरणम  गच्छामि

– सारिका भंडारे 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका