थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
“अस्तरीकरण पूर्ण होऊन सुद्धा पाण्याचा प्रवाह गेज मैल 93 पासून नेहमीच नियमित राहत नाही. वरच्या तालुक्यातील दिग्गज नेते मंडळीमुळे सतत आमच्या तालुक्यावर अन्याय होतो आहे. हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार? यापुढे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या तालुक्यावरील अन्याय सहन करणार नाही” असा आक्रमक इशारा सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.
निरा उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक पुणे विश्रामगृह येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यामध्ये सांगोल्याच्या पाणी प्रश्नाविषयी दिपकआबा आक्रमक झाले.
पाणी वाटपाचे नियोजन ढिसाळ
दीपकआबा म्हणाले की, मैल 93 पासून सांगोला व पंढरपूर या तालुक्याला मिळणारा पाण्याचा प्रवाह हा नेहमीच पूर्ण क्षमतेचा राहत नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेसा कर्मचारी वर्ग तेथे उपलब्ध नसल्यामुळे पाणी वाटप करण्याचे नियोजन अतिशय ढिसाळ झालेले आहे. यामध्ये माजी आमदार दिपकआबांनी तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे सदर भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेला निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली.
या मागणीवर मंत्रिमहोदय,अधिकारीवर्ग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सांगोला व पंढरपूर विभागाचे प्रश्न अतिशय जिव्हाळ्याने मांडत असताना दिपकआबा चांगले आक्रमक झाले.
अस्तरीकरणाची फसवणूक
पुढे ते म्हणाले की शासनाच्या विनंतीवरून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालवा अस्तरीकरणाला इच्छा नसताना सुद्धा शासनाने यावेळी तुम्ही अस्तरीकरण करा तुम्हाला जास्तीचे पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. या शासनाच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाला पाठिंबा दिला.
हे अस्तरीकरण पूर्ण होऊन सुद्धा समाधानकारक गेज मैल 93 पासून पाण्याचा प्रवाह नेहमीच नियमित राहत नाही.वरच्या तालुक्यातील दिग्गज नेते मंडळीमुळे सतत आमच्या तालुक्यावर अन्याय होतो हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार? यापुढे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या तालुक्यावरील अन्याय सहन करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मंत्रिमहोदय व अधिकारीवर्ग यांनी सकारात्मक उत्तरे देऊन इथून पुढे हा अन्याय होणार नाही व सांगोला व पंढरपूर या दोन्ही तालुक्याला मिळणाऱ्या लाभाचे योग्य ते नियोजन केले जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
या बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देशमुख साहेब, आमदार दत्तात्रय भरणे,आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार जगताप, आमदार रवींद्र धंगेकर,मुख्यअभियंता, अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्रिमहोदय व अधिकारीवर्ग यांनी सकारात्मक उत्तरे देऊन इथून पुढे हा अन्याय होणार नाही व सांगोला व पंढरपूर या दोन्ही तालुक्याला मिळणाऱ्या लाभाचे योग्य ते नियोजन केले जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.