ताजे अपडेट
Trending

सांगोल्यात नववर्षात असेल निवडणुकांचा धमाका

दीपकआबा गटाची भूमिका महत्त्वाची

Spread the love

सध्या तरी कोणत्याच पक्षाचा नेता अद्याप बाहेर जनतेत गेला नाही. ग्रामीण भागातील नेते व कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या नेत्याकडे जाऊन, भेटीगाठी घेऊन खुंटा हलवून जाम करण्याच्या नादाला लागलेले दिसून येत आहे.

विशेष राजकीय वार्तापत्र / डॉ. नाना हालंगडे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा धुरळा अजूनही खाली बसला नाही. विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार अद्याप सावरले नाही व विजयी उमेदवारही अजून स्थिरावले नाहीत, तोवरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्षांची निवडणूक तयारीच्या दृष्टीने खलबते सुरू आहेत. अशा तापलेल्या राजकीय स्थितीत सांगोला तालुक्यात सत्तेत असलेला शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार? की ज्यांच्यासोबत नुकताच निवडणूक सामना केला त्यांच्याशी सलगी करणार हे नव्या वर्षात स्पष्ट होणार आहे. येणारे नवे वर्ष या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

तालुक्यात यापूर्वी अनेकवेळा स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतराव देशमुख, माजी आम. ॲड. शहाजी पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे तिघेही एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत होते. तोच प्रयोग 2025 मध्ये होतो का? याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा विधानसभा निवडणुकीत मताचा दर पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत किती दर निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते विधानसभा निवडणुकीत मोकळे झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सामोपचाराने घेण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहेत.

सध्या तरी कोणत्याच पक्षाचा नेता अद्याप बाहेर जनतेत गेला नाही. ग्रामीण भागातील नेते व कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या नेत्याकडे जाऊन, भेटीगाठी घेऊन खुंटा हलवून जाम करण्याच्या नादाला लागलेले दिसून येत आहे.

माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे काय भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्वगृही जातात? की भाजपमध्ये जातात? याबाबत सध्या जोरात चर्चा आहे. गेले तर युतीतील कोणत्यातरी घटक पक्षातच जातील, असा अंदाज बांधला जात आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सध्या मुंबईत उपचार घेत असल्यामुळे शिवसेना भवनमध्ये सामसूम दिसून येत आहे. कार्यकर्ते येतात, पराभवाच्या गप्पा मारतात. “बघूया, नूतन आमदार हा बापूएवढा निधी आणतोय का?” याची चर्चा करून पुन्हा गावी परत जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचा पराभव झाला असला तरी कार्यकर्ते मात्र अद्याप खंबीर असून पंचायत समितीवर व नगरपालिकेवर वाटेल ती किंमत मोजू, परंतु महायुतीचा झेंडा फडकावू, या ईर्षेने उभा कामाला लागलेले दिसून येत आहेत.

माणदेशी पट्ट्यातील आटपाडी भागातील शेतकरी काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून अजूनही सावरला नाही. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पत्रकार सुरेश मोकाशी (आटपाडी) यांनी खास “थिंक टँक”साठी टिपलेले छायाचित्र.

माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे काय भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्वगृही जातात? की भाजपमध्ये जातात? याबाबत सध्या जोरात चर्चा आहे. गेले तर युतीतील कोणत्यातरी घटक पक्षातच जातील व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर युती करून ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या पंचायत समितीवर 58 वर्षानंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीला लागतील, अशी जोरात चर्चा आहे.

पंचायत समिती व नगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर साळुंखे-पाटील यांच्या गटाला महत्त्व आहे. शेकापला किंवा बापूला या दोघांना साळुंके-पाटील गटाला बरोबर घेतल्याशिवाय सत्ता मिळवता येणार नाही, हे विधानसभा निवडणुकी प्रसंगी दिसून आल्याने साळुंके-पाटील हे जिकडे असतील तिकडे गुलाल दिसून येणार आहे.

तालुक्यातील जे सर्व खात्याचे अधिकारी आहेत ते महायुतीतील नेत्यामुळेच सांगोल्यात आलेले आहेत. आता राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्याने या अधिकाऱ्यांची जागा भक्कम झाली आहे . त्यांच्या दृष्टीने आमदार बदलला तर काहीही फरक पडणार नाही, या अविर्भावात ते असल्याचे दिसून येते.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा मध्यवर्ती बँक यावर आजपर्यंत शेकापचे वर्चस्व राहिले आहे. हे पुन्हा वर्चस्व मिळवायचे असेल तर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना शेकापमधील गटबाजी संपवावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शेकापला म्हणावी तेवढी सोपी राहणार नाही. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या हयातीत नगरपालिकेवर नवखा तरुण नेता आनंद माने यांनी स्वतःच्या पत्नीला जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आणलेच; परंतु स्वतःसह त्या गटाचे सहा नगरसेवक निवडून आणले होते. आज तेवढी ताकद आनंद माने यांची राहिली नसली तरी, त्यांना कमी लेखून चालणार नाही,अशी चर्चा आहे. आम.डॉ. बाबासाहेब व डॉ.अनिकेत देशमुख यांना त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागणार आहे.

भाजप व काँग्रेस पक्षाचेही प्राबल्य तालुक्यात बऱ्यापैकी आहे. या पक्षाला स्वतःच्या ताकदीवर नगरसेवक अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य निवडून आणता येईल एवढी त्यांची ताकद दिसून येत नाही. परंतु जय – पराजयात त्यांची ताकद आहे. त्यादृष्टीने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, माजी आम. दीपकआबा साळुंखे- पाटील हे नेते कोणती भूमिका घेतात यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.

आ.डॉ.बाबासाहेब देशमुख हे आमदार होऊन एक महिना झाला तरी महाविकास आघाडी की महायुती बरोबर राहणार हे स्पष्टपणे जाहीर केलेले नाही.

तालुक्यातील जे सर्व खात्याचे अधिकारी आहेत ते महायुतीतील नेत्यामुळेच सांगोल्यात आलेले आहेत. आता राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्याने या अधिकाऱ्यांची जागा भक्कम झाली आहे . त्यांच्या दृष्टीने आमदार बदलला तर काहीही फरक पडणार नाही, या अविर्भावात ते असल्याचे दिसून येते.

नागरिकांच्या नशिबाचे भोग अद्याप संपलेले नसल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी बरोबर राहायचे असेल तर व अधिकारी वर्गावर अंकुश निर्माण करावयाचा असेल तर स्वर्गीय आबासाहेब यांच्या सारखा प्रशासन व मंत्रिमंडळावर दबाव निर्माण करावा लागणार आहे. नाहीतर युतीबरोबर जाऊन तालुक्याच्या विकासासाठी निधी व योजना आणाव्या लागणार आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

एकूणच 2025 हे वर्ष निवडणुकीच्या धुरळ्यात न्हाऊन निघणार हे नक्की!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका