सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
एकेकाळी विधानसभेतील मुख्य आणि प्रभावी विरोधी पक्ष तसेच काहीकाळ सत्तेतही महत्त्वाची भूमिका निभावलेल्या शेतकरी कामगार पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केविलवाणी अवस्था झाली. पाचपैकी चार उमेदवार पराभूत झाले. मात्र, डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या रूपाने एकमेव आमदार सांगोला येथून निवडून आला. त्यामुळे राज्यातील शेकापचे विधानसभेतील नेतृत्व करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब देशमुखांवर आली आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने शेतकरी कामगार पक्षाचा एकमेव आमदार विधानसभेत राज्यातील शेकापचे नेतृत्व करणार आहे.
आ. बाबासाहेबांवर शेकापच्या प्रतिनिधित्त्वाची धुरा
राज्यात डॉ. बाबासाहेब देशमुख हे एकमेव उमेदवार शेकापकडून निवडून आल्याने त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणानुसार विधिमंडळात भूमिका मांडण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. विधानसभेत तसेच विविध अधिवेशनांमध्ये पक्षाच्यावतीने भूमिका मांडायला दुसरा कोणीच उमेदवार नसल्याने आ. बाबासाहेब देशमुख यांनाच ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या विकासात्मक राजकारणाचा वारसा असल्याने आणि उच्चशिक्षित असल्याने आ. डॉ. बाबासाहेब देशमुख हे ती जबाबदारी ताकतीने पार पाडतील, असा विश्वास शेकापच्या नेतेमंडळींना वाटतो.
शेकापच्या केंद्रस्थानी सांगोला
विधानसभा निवडणुकीत एकमेव सांगोला विधानसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडून आल्याने आता सांगोला तालुका शेकापच्या केंद्रस्थानी आला आहे. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये लाल बावटा शून्यावर आला आहे.
पक्ष सत्तेत रमला नाही
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेस सत्तेत असताना शेकापने सातत्याने विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत प्रखरपणे निभावली होती. एकदा अपवाद वगळता हा पक्ष कधीच सत्तेत नव्हता. २००४ च्या अगोदर रायगड जिल्ह्यामधील मोहन पाटील आणि मीनाक्षी पाटील हे दोन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर हा पक्ष विरोधी बाकावर कायम बसला. २००९ पासून या जिल्ह्यांमध्ये शेकापला उतरती कळा लागली. पनवेल हा गड आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या वेळी काबीज केला. त्यानंतर कालांतराने पेण, उरण आणि अलिबाग हे तिन्ही हक्काचे मतदारसंघ विरोधकांच्या ताब्यात गेले. विशेषकरून अलिबागमध्ये दुसऱ्यांदा महेंद्र दळवी आमदार झाले. हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता; परंतु या ठिकाणी धनुष्यबाणाला सलग दुसऱ्यांदा पसंती मिळाली.
पेण विधानसभा मतदारसंघात २०१९ ला धैर्यशील पाटील यांचा पराभव झाल्यानंतर लगेचच ते भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे शेकापची ताकद काहीशी कमी झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी अतुल म्हात्रे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली; परंतु रवीशेठ पाटील यांनी त्यांचा पराभव केला. उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रीतम म्हात्रे यांना शेकापने निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मत घेतली असली तरी भाजपचे महेश बालदी यांनी त्यांना पराभूत केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बाळाराम पाटील तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उभे राहिले. मालमत्ता कर मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक गाजविली. प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात मोठे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी ठरले. मात्र, त्यांनाही पराभव पत्करावा लागला. आमदार ठाकूर यांनी ही निवडणूक चौथ्यांदा जिंकली. तिसऱ्यांदा बाळाराम पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाला ठाकूर यांनी चितपट केले. या ठिकाणी ठाकरे शिवसेनेकडून लीना गरड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले. या दोघांच्या भांडणांमध्ये महायुतीने काहीसा लाभ घेतला.
शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या ठिकाणी उमेदवार दिले होते. पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी उमेदवारांची घोषणा केली होती. महाविकास आघाडीमध्ये तीन मतदारसंघ शेकापला सोडण्यात आले होते; परंतु या पक्षाने उरणमध्ये प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यांनी माघार न घेतल्यामुळे पनवेल आणि पेण या विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला. अलिबाग या ठिकाणी पाटील कुटुंबीयांमधील उमेदवार होता. चारही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले.
पाचपैकी चारजण पराभूत
विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने बाळाराम दत्तात्रय पाटील (पनवेल), चित्रलेखा पाटील (अलिबाग), अतुल म्हात्रे (पेण), प्रीतम म्हात्रे (उरण), डॉ. बाबासाहेब देशमुख (सांगोला) हे पाच उमेदवार रिंगणात उतरवले होते. हे सर्व उमेदवार शिट्टी या चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेले. “लढेंगे और जितेंगे’’ हे घोषवाक्य घेऊन ते मैदानात उतरले होते. शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत चिन्ह खटारा हे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यामुळे काही काळ शेतकरी कामगार पक्षामध्ये चिन्हाबाबत वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्या होत्या. पाचही उमेदवारांनी शिट्टी हे चिन्ह घेतले. मात्र पक्षाचे पारंपरिक खटारा हे चिन्ह नसल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसल्याचे दिसून आले. पाचपैकी चार उमेदवार पराभूत झाले. सांगोला मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला.
भाई गणपतराव देशमुख यांची उणीव
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नुकसान झाले. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक शेकापने लढवली. पक्षाच्या ध्येयधोरणात आणि राजकीय रणनीतीमध्ये भाई गणपतराव देशमुख यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनानंतर शेकापमध्ये पोकळी निर्माण झाली. असे असले तरी भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख निवडून आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास दुणावला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोला येथून निवडून आल्याने शेकापचा बालेकिल्ला अविरतपणे सांगोला मतदारसंघावर आपला झेंडा फडकवत राहील, असा विश्वास पक्षातील नेतेमंडळी व्यक्त करीत आहेत.
तरुण आणि अभ्यासू आमदार
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला मतदारसंघात दोघा मातब्बर उमेदवारांना चितपट करून मोठ्या मताधिक्याने सांगोला मतदारसंघावर पुन्हा एकदा लाल बावटा फडकवला आहे. बाबासाहेब यांना मानणारा मोठा वर्ग या भागात तयार झाला आहे. उच्चशिक्षित आणि अभ्यासू असलेल्या आ. बाबासाहेब देशमुखांनी निवडून येताच झपाटून कामाला सुरुवात केली आहे. निवडणूक काळात त्यांनी केलेला संकल्पनामा या मतदारसंघाला विकासाकडे घेऊन जाणार ठरेल, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.