सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांना डावलून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अँब्युलन्सचे उद्घाटन झाले. आरोग्य विभागाकडून प्रोटोकॉल पाळण्यात न आल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सांगोला तालुक्यातील सहा गावांसाठी एकूण सहा अँब्युलन्स मंजूर झाल्या आहेत. तालुक्यातील नाझरा, अकोला, महूद, कोळा, जवळा, घेरडी या गावांना या ॲम्बुलन्स मंजूर आहेत. या ॲम्बुलन्स सांगोला पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या ॲम्बुलन्सच्या उद्घाटनासाठी विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.
दुपारी अडीच वाजता या ॲम्बुलन्सचे उद्घाटन होणार होते. मात्र विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वीच पाच मिनिटे अगोदर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी या ॲम्बुलन्सला नारळ फोडून उद्घाटन केले. आयोजकांनी त्यांना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे येत आहेत पाच मिनिटे थांबा, अशी विनंती केली. मात्र माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी “मला मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला जायचे आहे” असे कारण सांगून विद्यमान आमदार येण्यापूर्वीच नारळ फोडून उद्घाटन केले आणि तिथून काढता पाय घेतला.
शहाजीबापू हे तिथून निघत असतानाच विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हे कार्यक्रमस्थळी आले. आपल्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे अशी त्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, मात्र ते येण्यापूर्वीच उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करून तिथून निघून जाणे पसंत केले. ही घटना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजतात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.