
नागपूर : विशेष प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर जावून तथागत भगवान बुद्ध यांना वंदन केले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील हे पहिलेच अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते दीक्षाभूमीवर गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच पवित्र भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा लाखो अनुयायांसमवेत घेतली होती. या पत्रिव अशा दीक्षाभूमीला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी परिसराची माहिती जाणून घेतली.
दीक्षाभूमी जागतिक ऊर्जा केंद्र
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५,००,०००० अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.
बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले, एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानाची ओळख बनली. दरवर्षी येथे लाखो बौद्ध बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात. इथे एक भव्य स्तूप निर्माण केला गेला, बावीस प्रतिज्ञांचा स्तंभही उभारला गेला. येथे बोधिवृक्ष लावला गेला व बौद्ध भिक्खू भिक्खूणींच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधण्यात आले आहे.
