
जन्मदिन विशेष/डॉ.नाना हालंगडे
महाराष्ट्राच्या विधानसभेतील भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख अखिल भारताला झाली, ते नेतृत्व म्हणजे आमदार भाई डॉ. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचे नातू आमदार डॉ.बाबासाहेब पोपटराव देशमुख यांचा आज वाढदिवस आहे.. त्यानिमित्त हा विशेष लेख.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा जन्म 3 जानेवारी म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्या जन्मदिनी पेनूर (ता.मोहोळ) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पेनुर येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत झाले. पाचवी नंतरचे माध्यमिक शिक्षण श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर, तर 11 ते 12 वी दयानंद कॉलेज लातूर येथे झाले. बारावीत मिळालेल्या उत्तुंग यशामुळे औरंगाबाद येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला एम.बी.बी.एस. ला अॅडमिशन मिळाले व तेथे त्यांना पहिली डॉक्टरेट पदवी मिळाली.

वर्षभर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णांची सेवा केली. त्यानंतर ‘जनस्वास्थ सहयोग’ गनियारी (बिलासपुर छत्तीसगढ) या सेवाभावी संस्थेत दीड वर्षाहून अधिक काळ आदिवासी बांधवांची सेवा केली. यानंतर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे एम.डी. (मेडिसिन) पूर्ण केले.
रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्स, कलकत्ता या एनजीओत डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एन.मिल. हा तीन वर्षाचा कोर्स करीत असताना (कोविड-19 च्या काळात) जवळजवळ पाच हजाराहून अधिक लोकांची अँजिओप्लास्टी व पेसमेकर बसवण्याचे यशस्वी काम केले.
एम.डी. करत असताना नॅशनल लेवलचे दोन रिसर्च पेपर प्रसिद्ध केले. तसेच जगप्रसिद्ध इंटरनॅशनल जर्नलमध्ये तीन रिसर्च पेपर प्रसिद्ध केले. दक्षिण कोरियामध्ये भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 2021 मध्ये रिसर्च पेपर प्रेझेंट केला. तसेच 2019 मध्ये कलकत्ता येथे उद्भवलेल्या वादळात आदिवासी बांधवांना मदत कार्य करण्यात सक्रिय सहभाग घेतला.
डॉ.बाबासाहेब देशमुख यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने व तसे त्यांना संस्कार झाल्याने त्यांनी अनेक सामाजिक संस्थांबरोबर समाजहितासाठी सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
गोरगरीब, अनाथ मुलांच्या संगोपन कार्यात, एड्स निर्मूलन कार्यात ते अग्रेसर राहिले. गरीब, होतकरू, मुले व मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे सतत सहकार्य असते. नव्या पिढीतील युवक-युवतींना प्रेरणा देणारे, दिशा देणारे नेतृत्व म्हणून सांगोला तालुका त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. त्यांनी अनेक समाजोपयोगी संस्थेतून सामाजिक कार्यातून लोकांच्या अडचणी सोडवून त्यांना धीर व आधार देण्याचे काम अखंड सुरू ठेवले आहे.

त्यांना खेळाची विशेष आवड आहे. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना 17 वर्षाखालील गटात हॉलीबॉलचे चॅम्पियनशीप व एम.बी.बी.एस. करीत असताना राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची दखल महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकर्यांचा तारणहार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे शेकापचे सरचिटणीस धडाडीचे आमदार भाई जयंत पाटील (अलिबाग) यांनी दखल घेतली. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांची पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी व राज्य चिटणीस मंडळाच्या सदस्यपदी निवड केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला.
आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.