
सांगोला : विशेष प्रतिनिधी
महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला करून देवून माता सावित्रीमाई फुले यांनी देशावर अनंत उपकार केले आहेत. आज महिला वर्ग विविध क्षेत्रात सर्वोच्च पदांवर कार्यरत आहेत. याचे सर्वप्रथम श्रेय सावित्रीमाई फुले यांना जाते. सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी स्वाभिमानाने, हिमतीने वाटचाल करावी, असे प्रतिपादन बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केले.
जि.प.प्राथ.शाळा भिमनगर सांगोला येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती तसेच आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
3 जानेवारी 2025 रोजी जि. प .प्रा. शाळा भीमनगर सांगोला येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. तसेच नूतन आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन भिमनगर परिसरातील प्रतिष्ठित महिलांच्या हस्ते करण्यात आले. समाजसेवक बापूसाहेब ठोकळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा थोडक्यात आपल्या मनोगतात घेतला. स्त्रियांविषयी जाणीव जागृती व मुलींच्या शिक्षणाविषयीचे महत्त्व यावर मांडणी केली.
यावेळी रेश्माताई बनसोडे, मैनाताई बनसोडे, जयाताई कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन, वेशभूषा इत्यादीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोमल ठोकळे, प्रवीण बनसोडे, महादेव बनसोडे, धिरज भोरकडे, कपिल बनसोडे, सविताताई बनसोडे, रतनताई बनसोडे, अंगणवाडी ताई जयंतीताई बनसोडे लक्ष्मीताई बनसोडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या सहशिक्षिका मैना गायकवाड व मुख्याध्यापक वैशाली शेळके यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.