स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी उपयुक्त ठरलेली म्हैसाळ योजना सध्या थकबाकी अभावी आभासी वाटत असून सांगोला तालुक्याची 29 लाख रुपये इतकी थकबाकी थकलेली आहे. तरीही सांगोला तालुक्यात याच पाण्याचे आवर्तन कालपासून सुरू झाले, असून डिकसळमधील वितरिका क्रमांक एकमध्ये पहिली चाचणी घेण्यात आली. आता पाणीपट्टी नाही भरली तर जलसंकट अटळ आहे.
शेतीसाठी उपयुक्त ठरणारी म्हैसाळ पाणीपुरवठा योजना सांगोला तालुक्यासाठी संजीवनी देणारी ठरत असून, सध्या उन्हाळी आवर्तन मागील फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी जत तालुक्यात या पाण्याने मागील आठ दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे. येथील लोकांचा मागण्या व पाणीपट्टी भरल्याने येथे हे पाणी सुरू आहे. मात्र, सांगोला तालुक्यातील दहा गावातील कोणत्याही गावांची मागणी नसल्याने रविवारी सांगोला वितरिका क्रमांक एक मधून याची चाचणी घेण्यात आली.
सध्या फक्त जत तालुक्यातील लोहगाव येथीलच मागणी आलेली आहे. पण हे पाणी त्यांना द्यावयाचे झाल्यास, डिकसळमधील वितरिकेमधूनच द्यावे लागते. पण जागोजागी व्हॉल्व आहेत. येथे मात्र फुकटचंबू हेच पाणी वळवून घेतील असे प्रकार पहावयास मिळणार आहेत.
गतवर्षी असे प्रकार झाले होते. मात्र यावर्षी म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ कार्यालयानेच आदेश काढले असून, जो कोणी चोरी करेल त्यांच्यावर कडक कारवाई ही तात्काळ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सांगोला तालुक्यातील दहा गावांसाठी ही योजना खूपच उपयुक्त आहे. गेली पाच-सहा वर्षांपासून येथील शेतकरी परिपूर्ण लाभ घेत आहेत. डिकसळ,नराळे, हबिसेवाडी,पारे,घेरडी,हांगिरगे गावडेवाडी यासह अन्य गावांना हे पाणी उपयुक्त आहे. यात सांगोला वितरीका क्रमांक ही बंधिस्त असून, याची लांबी तेरा किलोमिटर इतकी तर वितरिका क्रमांक दोन ही पोटकॅनाल असून याची लांबी 17 किलोमिटर इतकी आहे. तर याच दोन्ही वितरिकेवर 120 किलोमिटर इतकी सबलाईनची कामे सुरू आहेत.
आता सध्या सांगोला तालुक्यातील कोणत्याही गावांची मागणी नाही. पण पाणी आले म्हणून,जो तो शेतकरी मात्र जाम खूष आहे. सध्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचीच 29 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये घेरडी व परिसरातील गावांची ही थकबाकी ही सात लाखाच्या पुढे आहे. आताही कोणाची मागणी आलेली नाही. मागणी अन् त्याभागातील शेतकऱ्यांनी डिडि काढला तरच त्यांना पाणी देण्यात येणार आहे.
फक्त लोहगावकरांचीच मागणी
म्हैसाळ योजनेचे पाणी फक्त जत तालुक्यातील गावानाचं सुरू आहे. त्यात आताही जत तालुक्यातील लोहगावकरांचीच मागणी आहे. पण यांना पाणी द्यावयाचे झाले तर डिकसळमार्गेच द्यावे लागते. मग येथे मात्र फुकटचंबू पाणी फोडणार हेही तितकेच खरे आहे. मात्र सांगोला तालुक्यातील एकाही गावाची मागणी नाही. त्यामुळे गतवेळेप्रमाणे यावर्षी कोणासही फुकट पाणी मिळणार नाही.
पहिली चाचणी झाली
म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन 20 फेब्रुवारी रोजी सुरू झाले आहे. मागील आठ दिवसापूर्वी हेच पाणी जत तालुक्यात आलेले आहे. सांगोला तालुक्यात रविवार 19 मार्च रोजी याच पाण्याची चाचणी घेण्यात आली. पण लोकांची मागणी अन् पाणीपट्टीचे पैसे आले तरच आता हे पाणी मिळणार आहे,अन्यथा पाणी मिळणार नाही.
चोरी कराल तर गुन्हे दाखल
म्हैसाळ योजनेचे हे उन्हाळी आवर्तन तीन महिने चालणार आहे. कोणीही चोरी करून, हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये,अन्यथा संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात येथील. त्यामुळे सर्वच शेतकरी बांधवांनी रीतसर मागणी करून पैसे भरूनच हे पाणी घ्यावे. योजना ही तुमच्यासाठी आहे. त्यामुळे सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
पाणी चोरीही मोठ्या प्रमाणात
सांगोला तालुक्यात म्हैसाळ योजनेचे हे पाणी हे सांगोला वितरीका क्रमांक एक व दोन याद्वारे मिळते. पण दरवेळी मोठ्या प्रमाणात याच पाण्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होते. जो तो रात्रीच्या वेळी हे पाणी पळवित असतो. नेमलेले कंत्राटी कर्मचारी ही ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. तर अधिकारी वर्ग ही कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने फुकटच्या पाण्यावर ताव मारणारे शेतकरी मात्र तोऱ्यात पहावयास मिळत आहेत. गतवेळीच ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली पण त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे. ही म्हैसाळ थकबाकीत अडकली आहे.
सबलाईन निर्कृष्ट दर्जाची
सांगोला तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या दोन्ही वितरिकेवर सबलाईन ही 120 किलोमिटर इतकी आहे. पण अधिकारी अन् ठेकेदारांच्या मनमानीप्रमाणे ही लाईन टाकण्यात आलेली आहे. याच सबलाईनचे चेंबर ही शेतकऱ्यांना उपयुक्त पडतील असे नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याना सांगितले, पण याच अधिकाऱ्याने यात कोणतीच सुधारणा केली नाही. हीच सर्व कामे दर्जाहीन केली आहेत. त्यामुळे वितरिका क्रमांक एकमधील शेतकऱ्याना हा नाहक त्रास सोसावा लागत आहे. ही सबलाईन कुचकामी ठरीत आहे.
वितरिका क्रमांक एक फुटली
सांगोला वितरिका क्रमांक ही 13 किलोमिटरची आहे. हीच लाईन सध्या सबलाईनची कामे करताना फुटली आहे.याला दीड फुटाचे भगदाड पडले आहे. आता लोहगावकरानी मागणी केली आहे अन् पैसे भरले आहेत. त्यांना आता कसे पाणी मिळणार. हीच सबलाईनची कामे करताना अनेक शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. याची मात्र कोणीच दाखल घेत नाही. हीच तेरा किलोमिटरची लाईन सिमेंटची आहे. गतवर्षी याच्याच पुढे ही फुटली होती. हीच लाईन आश्रमशाळेच्या पाठीमागे फुटली आहे.
हक्काच्या पाण्यासाठी पैसेही भरा
शेतीच्या पाण्याची म्हैसाळ योजना ही आपल्या हक्काचीच आहे. त्यासाठी खर्च ही तेवढाच आहे. गतवर्षीपर्यंतची 29 लाख रुपये इतकी थकबाकी आहेच. अधिकारी दरवेळीच पैसे भरा म्हणून सांगतात. ग्रामपंचायतींना पत्रेही देतात, पण कोणीच गांभीर्याने घेत नाहीत. जसे की हक्काने पाणी फोडता तसेच हक्काने पैसेही भरा. तरच ही योजना कायमस्वरुपी चालणार आहे.