सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
फेरमतदानाच्या हट्टाला पेटलेल्या मारकडवाडीची राज्यात जोरदार चर्चा झाली. मात्र, मंगळवारी गावात पोलिसांनी दंडुक्याचा धाक दाखवून मतदान प्रक्रिया रोखली. असे असले तरीही मोठ्या ताकदीने दोन हात करायची तयारी दाखवलेल्या ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाला मोठी चपराक दिली आहे.
अडीच हजार लोकसंख्येचे गाव
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव मागील आठवड्यापासून चांगलेच प्रकाशझोतात आले. जेमतेम अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने जिल्हा प्रशासनासह राज्य निवडणूक आयोगाची चांगलीच झोप उडविली. एरव्ही या गावाची फारशी चर्चा नसायची. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सजग असलेल्या या गावाने राज्याचे लक्ष वेधून घेतले.
नेमकी मागणी काय?
या गावात दोन हजाराच्या आसपास मतदार आहेत. धनगर समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माळशिरस मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग या गावात आहे.
पोलिसांनी लोक एकत्र आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. मारकडवाडी गावात जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळाले. पोलीस आणि आमदार उत्तम जानकर यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर मतदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मारकडवाडीतून भाजप उमेदवार राम सातपुते यांना 843 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकरांना 1003 मतं मिळाली. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त 100 ते 150 मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजार पेक्षा जास्त मतं अपेक्षित होती. हे सगळं ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे.
निकालानंतर जानकर यांनी यावर भाष्य करत मतदान प्रक्रिया संशयास्पद असल्याचा दावा केला. तेथूनच ग्रामस्थांत खदखद सुरू झाली. अख्खे गाव जानकर यांच्या बाजूने असताना इतकी कमी मते कशी पडू शकतात असा सवाल उपस्थित झाला. इव्हीएम मशीन बाजून सारून मत पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. तेथूनच खऱ्या आंदोलनाला सुरुवात झाली.
निवडणूक विभागाचा सावध पवित्रा
मारकडवाडी ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानावर संशय व्यक्त केला. पुन्हा एकदा नव्याने निवडणूक घेण्याची मागणी लावून धरली. मात्र निवडणूक आणि पोलीस प्रशासनाने नकार दिला. तरीही ग्रामस्थ मागे हटले नाहीत. त्यांनी लोकवर्गणी काढून मतपत्रिका छापून घेतल्या. मंगळवारी फेरमतदान घेण्याचे निश्चित झाले. गावात मतदान केंद्र उभारण्यात आले. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच सोलापूरहून पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. मतदान केंद्र आणि तेथील साहित्य ताब्यात घेण्यात आले. ही प्रक्रिया न थांबल्यास ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून ताब्यात घेण्याची तंबी देण्यात आली. परिस्थिती चिघळू नये म्हणून या मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी मध्यस्थी करून तात्पुरती माघार घेतली.
पुढे काय?
मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान रद्द करण्यात आले असले तरी या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा आमदार उत्तम जानकर यांनी दिला. येत्या काही दिवसांत वीस ते पंचवीस हजार लोकांच्या उपस्थितीत मोर्चा काढून निवडणूक आयोगाला जाब विचारणार असल्याचे आमदार जानकर यांनी जाहीर केले.
मारकडवाडीसारखीच अनेक गावात खदखद
मारकडवाडी गावाप्रमाणेच तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे. आमच्या उमेदवारास मोठ्या प्रमाणात मतदान करूनही आम्ही दिलेली मते कुठे गेली? असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. तालुक्यातील असंतोषाला मारकडवाडीने पुढाकार घेऊन वाचा फोडली असली तरी ईव्हीएम विरोधात राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे असे म्हणावे लागेल.
नाना पटोलेंकडून ग्रामस्थांचं कौतुक
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावक-यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारकडवाडी ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले.
आज नेमकं काय घडलं?
बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आमदार उत्तम जानकर आणि मारकडवाडी ग्रामस्थ यांच्यात ग्रामपंचायतीच्या बंद खोलीत बैठक पार पडली. पोलिसांनी लोक एकत्र आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. मारकडवाडी गावात जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळाले. पोलीस आणि आमदार उत्तम जानकर यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर मतदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राम सातपुतेंचा हल्लाबोल
बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे मारकडवाडी ग्रामस्थांचे आंदोलन नव्हते. हे आंदोलन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी खोट्या नेरेटिव्हच्या माध्यमातून प्रशासनाला राज्य स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न होता. ईव्हीएमच्या नावाने बोंब मारायची, हा रणजितसिंह मोहिते पाटील यांचा डाव होता. तो डाव प्रशासनाने हाणून पाडला आहे. आमदार उत्तम जानकर हे प्यादं आहे. पण, या प्रकरणाचा मास्टर माईंड हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेच आहेत, अशा शब्दांत माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी मारकडवाडी मतदान प्रक्रियेवरून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.