ताजे अपडेट
Trending

बापू, आबा, श्रीकांत देशमुखांना आमदारकीची संधी!

विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त, तालुक्याच्या आशा पल्लवित

Spread the love

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
विधान परिषदेतील सहा विद्यमान आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या ४, शिवसेना शिंदे गट १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १ अशा एकूण सहा आणि राज्यपाल कोट्यातील पाच अशा एकूण अकरा जागा रिक्त असल्याने इच्छुकांकडून ताकदीने लॉबिंग सुरू आहे. यामध्ये सांगोल्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आणि भाजपचे नेते श्रीकांत देशमुख यापैकी एकाची नक्की वर्णी लागेल, असा कयास राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले. तर भाजपचे गोपीचंद पडळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली. शिंदे गटाचे आमश्या पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. तसेच भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवला.

विधानसभा निवडणुकीत सहा विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने आणि राज्यपाल कोट्यातील आणखी पाच जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आधीच विधान परिषद सदस्य होण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण ९ विधान परिषद आमदार, तर एक राज्यसभा खासदार होते.

मागच्या दरवाजाने वरच्या सभागृहात
सहा विधानपरिषदेच्या रिक्त जागा आणि राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागा मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना परिषदेची जागा हवी होती. त्यांच्यापैकी काहींनी विधानसभा निवडणूकही लढवली आणि पराभूत झाले, परंतु त्यांनी आपापल्या पक्षांना परिषदेवर पुनर्वसन करण्यास सांगितले आहे. ही यादी पुष्कळ मोठी आहे. निवडणुकीत पराभूत झालेले काही आमदार परिषदेच्या मार्गे मागच्या दरवाजाने प्रवेश आणि राजकीय पुनर्वसन करण्याच्या शोधात आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात.

सांगोल्यातून कुणाला संधी?
सांगोला विधानसभा मतदारसंघात किमान एकाजणाला विधान परिषदेवर घेतले जावू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये नुकतेच पराभूत झालेले माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी श्रीकांत देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे.

शहाजीबापू पाटील
सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले शहाजीबापू पाटील हे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत. त्यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकाप उमेदवाराकडून पराभव झाला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत शहाजीबापू पाटील यांचे महत्त्वाचे स्थान होते. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडात शहाजीबापू पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. फर्डे वक्ते, परखड टीकाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी मागील पाच वर्षात सांगोला विधानसभा मतदारसंघात भरीव निधी आणून असंख्य कामे मार्गी लावली आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शिंदे गटाकडून त्यांना विधान परिषदेवर घेतले जावू शकते.

दीपकआबा साळुंखे-पाटील
मूळचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनाही विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. दीपकआबा साळुंखे-पाटील हे सध्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अर्थात महाविकास आघाडीकडून सांगोला विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. असे असले तरीही दीपकआबा साळुंखे-पाटील यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला तालुक्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे वजन आहे. अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत. दीपकआबा साळुंखे-पाटील हे यापूर्वीही एकदा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते सध्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत असेल तरी नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे दिसते. हा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव असल्याचे दिसते. सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार हे विधान परिषदेवर संधी देतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

श्रीकांत देशमुख
श्रीकांत देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. देशमुख यांनी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देशमुख यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभा गाजविल्या होत्या. देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला तालुक्यात आहे. त्यांनी यापूर्वी जवळा गावात अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सांगोला तालुक्यात कुस्ती चळवळ वाढविण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी सांगोला मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. या दोन्ही वेळेस त्यांनी लक्षणीय मते खेचली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे श्रीकांत देशमुख यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

विधानपरिषदेची रचना कशी?

विधान परिषदेतील एकूण ७८ सदस्यांपैकी ३१ जण विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदार), २१ स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिकेसारख्या) निवडलेल्या प्रतिनिधींद्वारे, १२ राज्यपालांनी नामनिर्देशित केले आहेत. तर प्रत्येकी सात सदस्य मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांद्वारे निवडले जातात.

भाजपच्या 4 जागा रिक्त विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेतील भाजपच्या ४ आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली. सध्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. हे चार नेते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत.

विधान परिषदेचं संख्याबळ किती आहे ते पाहूया.. विधान परिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. यातील ३५ जागा सध्या महायुतीकडे आहे. तर महाविकास आघाडीचे सभागृहात १७ सदस्य आहेत. परिषदेत भाजपचे १९, राष्ट्रवादी काँग्रसचे ७ आणि शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे ७, काँग्रेसचे ७, राष्ट्रवादी शपचे ३ जण परिषदेवर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं, राज्यपालांनी ५ जणांची नियुक्ती न केल्यानं सध्याच्या घडीला २६ जागा रिक्त आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका