बारावी विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले, सेमीस्टर पद्धतीने दोनदा परीक्षा!
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
Maharashtra HSC Exams Semister Pattern : इयत्ता बारावीच्या वर्गात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. चालू वर्षापासून बारावीसाठी सत्र पद्धत अर्थात सेमिस्टर सिस्टीम लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. हा निर्णय झाला तर बारावीच्या विद्यार्थ्यांना (HSC Exams) वर्षाच्या शेवटी नव्हे, तर वर्षातून दोनदा म्हणजे प्रत्येक सहा महिन्यानंतर एक अशी दोन वेळा परीक्षा द्यावी लागणार आहे. या दोन्ही सेमिस्टरमधून स्वतंत्रपणे पास होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांसमोर असणार आहे.
आता बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळेस घेण्या संदर्भात विचार सुरू आहे. असा निर्णय झाल्यास सेमिस्टर पद्धतीनं वर्षातून बारावी बोर्ड परीक्षा दोन वेळेस घेतली जाईल, अशी माहिती मिळत आहे. याशिवाय बारावी बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अभ्यासक्रमाच्या मर्यादा न ठेवता विविध विषय निवडून बारावी बोर्ड परीक्षा देता येईल. नवे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीनं बारावी बोर्ड परीक्षांसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत. जर समितीनं केलेल्या शिफारशीनुसार, निर्णय झाल्यास, या बारावी बोर्ड परीक्षा नेमक्या कशा होतील? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसोबतच शिक्षकांच्या मनातही निर्माण झाला आहे.
नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क
फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी बारावी बोर्ड परीक्षा आता एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा घेण्याचा विचार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क नव्यानं तयार करणाऱ्या देशातील तज्ज्ञ मंडळींनी मांडला आहे. या नव्या फ्रेमवर्कनुसार, सेमिस्टर पद्धतीनं बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून एकदाच नाहीतर दोन वेळेस घेण्यात येतील.
विषयांची मर्यादा नसेल
शिवाय या नव्या फ्रेमवर्क नुसार, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना देण्याची मर्यादा नसेल.
बारावी बोर्ड परीक्षा एकाच वर्षी दोनदा सेमिस्टर पद्धतीनं घेतली जावी. बारावी बोर्ड परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्याला आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अभ्यासक्रमातील विषयांची मर्यादा नसावी. विद्यार्थ्याला बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांची कोर्स उपलब्ध ठेवावेत. त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील.
यासाठी अकरावी बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला जाईल. याआधी कोरोना काळात मागील शैक्षणिक वर्षात अशाप्रकारे बोर्डाच्या वर्षातून दोन वेळेस सेमिस्टर पद्धतीनं परीक्षा घेण्याचा प्रयोग सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाकडून करण्यात आला आहे. मात्र भविष्यात जर अशाच प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी ड्राफ्ट पूर्ण तयार झाल्यानंतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे अभिप्रायसुद्धा जाणून घेतले जाणार आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून बनवल्या जाणाऱ्या या ड्राफ्टनंतर या फ्रेमवर्कचा स्वीकार केला जाईल.
शिवाय राज्य सरकार राज्यातील शिक्षण पद्धतीत कशा पद्धतीनं बदल करून निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ताण कमी की वाढणार?
इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत थोडासा अवघड असतो. या अभ्यासक्रमाची परीक्षा वर्षाच्या शेवटी देताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. पण वर्षभराचा अभ्यास एकाच परीक्षेत करून त्याची उत्तरे लिहिणे हे फार अवघड बनून जात असते. सेमिस्टर सिस्टीम लागू केल्यास अभ्यासक्रम दोन सत्रांमध्ये विभागला जाईल. या नव्या विभागणीनुसार निम्म्या – निम्म्या अभ्यासक्रमाची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल. ही सेमिस्टर सिस्टीम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताची असेल. कारण वर्षाच्या अखेरीस एकदाच परीक्षेचा ताण घेण्याची ही सेमिस्टर सिस्टीम परीक्षेचा ताण कमी करेल असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्र सरकार या दृष्टीने विचार करीत असले तरी हा निर्णय घेताना पालकांचीही मते जाणून घेतली जातील असे दिसून येत आहे.
पालक या निर्णयाकडे कसे पाहतात हेही हा निर्णय लागू करताना महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरीही सरकार जो विचार करत आहे त्या दृष्टीने सर्व पावले पडत असल्याचेही दिसून येत आहे. हा निर्णय लवकरच अंतिम स्वरूपात पुढे येईल असे दिसते. हा निर्णय होईल तेव्हा होईल मात्र बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या बातमीमुळे दोन्ही सत्र गांभीर्याने घेऊन अभ्यास करावा लागणार आहे.